पुणे, 19 ऑक्टोबर : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान घातले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात अजूनही पाऊस पडत आहे. पुण्यापासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या उरळी कांचन परिसरात रविवारी दुपारी ढगफुटी झाल्याने बाजारपेठेत मोठमोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचे पाहण्यास मिळाले.
उरळी कांचनपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळती घाटात रविवारी दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत ढगफुटी झाल्याने वळती आणि शिंदवणे या गावात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले.
सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हे दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करून देण्यात आली. त्यामुळे या गावांमधून उरळी कांचनला जाणाऱ्या ओढ्याला पूर आला. या पुरामुळे ओढ्याच्या काठावरील अवैध बांधकामं आणि अतिक्रमणांना मोठा फटका बसला.
रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पुढं हे पाणी उरळी कांचनमध्ये घुसलं आणि संपूर्ण शहरात पसरलं. पुणे -सोलापूर महामार्गावर असलेल्या या उरळी कांचनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी तिथं तळ ठोकून आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी 17 ऑक्टोबर रोजी जनता वसाहतीमध्ये पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटल्यामुळे 40 घरात पाणी शिरले होते. जनता वसाहतीतून पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी पाईपलाईन आहे.
पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली, 40 घरांमध्ये शिरलं होतं पाणी pic.twitter.com/cptNaYxOyB
— News18Lokmat (@News18lokmat) October 17, 2020
अचानक रात्री ही पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. तब्बल 40 घरांमध्ये पाणी शिरले होते. काही घरात अक्षरश: गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. तर या दुर्घटनेमध्ये 9 जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.