पुणे, 21 जानेवारी : पुण्यात डेमू रेल्वे रुळावरुन घसरली (Demu train derailed in Pune) आहे. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाहीये. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
आठ दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात
13 जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघाताची मोठी घटना घडली होती. गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस (Guwahati-Bikaner Express) पश्चिम बंगालमधील डोमाहानीजवळ रूळावरून घसरली. या अपघातात अनेक जण जखमी झाले होते. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमनदलाचे जवान पोहोचले असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं.
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी परिसरात मैनगुडी येथे बिकानेर एक्स्प्रेसचे तब्बल 12 डब्बे रूळावरून घसरल्याने मोठा अपघात घडला होता. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांच्याकडून डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं होतं.
वाचा : जिवंत महिलेच्या किडनीचा केला सौदा, नेपाळी गायिकेनं घातला कोट्यवधींचा गंडा
संबंधित ट्रेन बिहारच्या पाटणा इथून आसामच्या गुवाहाटी इथं जात असताना मैनागुडी इथं ही दुर्घटना घडली. हा अपघात एवढा भयानक होता की, प्रवाशांनी भरलेले चार डबे थेट जमिनीवर, तर एक डबा पाण्यात कोसळला.
बिकानेर एक्स्प्रेसला परिसरातील आजूबाजच्या कोणत्याही रेल्वेस्थानकावर थांबा नव्हता. ट्रेन तिथून जात असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 30 ते 40 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या होत्या. तसेच सिलिगुडी इथून एक रिलिफ ट्रेन पाठविण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.