पुणे जिल्ह्यात लग्नात मिरवणुकीसाठी वाढतेय बैलांची मागणी; जाणून घ्या व्यवसायाचा नवीन फंडा

पुणे जिल्ह्यात लग्नात मिरवणुकीसाठी वाढतेय बैलांची मागणी; जाणून घ्या व्यवसायाचा नवीन फंडा

अलीकडच्या काही काळात लग्नाळू मुलामुलींचे विवाह अगदी साध्या पद्धतीनं साजरे होतं आहेत. तर लग्नाची वरात बैलगाडीवरून काढण्याची क्रेझही वाढली आहे.

  • Share this:

पुणे, 18 मार्च: गेल्या काही वर्षांपासून उच्च न्यायालयाने ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. त्यामुळे बैलगाडा प्रेमींचं अर्थकारण कोलमडलं आहे. त्यातच कोरोना विषाणूमुळे अशा लोकांना दुहेरी फटका बसला आहे. अशी एकंदरित परिस्थिती असताना जैदवाडी येथील सुभाष पोपट जैद यांनी परिस्थितीचं सोनं केलं आहे. त्यांनी आपली बैलजोडी सजवून लग्नासाठी देण्याचा नवीन व्यवसाय शोधून काढला आहे. खरंतर अलीकडच्या काही काळात लग्नाळू मुलामुलींचे विवाह अगदी साध्या पद्धतीनं साजरे होतं आहेत. तर लग्नाची वरात बैलगाडीवरून काढण्याची क्रेझही वाढली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील सुभाष पोपट जैद या शेतकऱ्याने व्यवसायाची नवीन संधी शोधली आहे.

एरवी लग्न म्हटलं की अलिशान गाड्या, अवाजवी खर्च हे सारं काही आलंच. पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात लग्नाचा ट्रेंड बदलला असून नागरिक आता साध्या आणि जुन्या पद्धतीने लग्न करण्याकडे वळत आहेत. यातच खेड तालुक्यातील जैदवाडी येथील सुभाष पोपट जैद यांनी नवरा-नवरीच्या मिरवणुकीसाठी सजवलेल्या बैलजोडीसह बैलगाडी भाड्याने उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याच्या या बैलजोडीला ग्रामीण भागासह शहरातूनही मागणी वाढली आहे.

न्यायालयाने बैलगाडा शर्यत बंदी आणल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जवळचे बैल विकून टाकले. मात्र जैदवाडीच्या सुभाष जैद यांनी अडगळीतल्या बैलगाडीला सजवून ही बैलगाडी लग्नातील मिरवणुकीसाठी भाड्याने देण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. सुभाष जैद आपली बैलजोडी आणि बैलगाडी विवाहस्थळी घेवून जाण्यासाठी टेम्पोचा वापर करतो. यासाठी त्यांना एका दिवसाचे साधारणतः 15 ते 20 हजार भाडंही मिळत आहे. या व्यवसायातून त्यांनी आतापर्यंत 6 तरुणांना रोजगारही दिला आहे.

हे ही वाचा-पुण्यातल्या चोरांचा थेट देवांवर डल्ला; मंदिरातून मुखवटे चोरीच्या 2 दिवसात 4 घटना

कोरोनानंतर आता मर्यादित लोकांच्या उपस्थितीत नागरिक साध्या पद्धतीनं लग्न करण्याचा घाट घालत आहेत. लग्नांमध्ये अवाजवी खर्च न करता पारंपरिक पद्धतीनं बैलगाडी रथाचा वापर करू लागले आहेत. सुभाष जैद या शेतकऱ्याने नवरा नवरीच्या मिरवणुकीसाठी सुरू केलेल्या बैलगाडी रथ व्यावसायाची संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या बैलगाडीची लग्न समारंभात चांगलीच मागणी वाढली असून यामुळे त्यांना चांगलाच फायदा होत आहे.

Published by: sachin Salve
First published: March 18, 2021, 7:44 AM IST

ताज्या बातम्या