पुणे, 23 मे, रायचंद शिंदे : अनेकदा घरातील कचरा घंटा गाडीत न टाकता तो रस्त्याच्या आजूबाजूला उघड्यावर फेकला जातो. मात्र आता अशा घटनांना चाप बसणार आहे. यासाठी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आणि वारुळवाडी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला आहे. कचरा उघड्यावर फेकणाऱ्या नागरिकांवर आता या दोन ग्रामपंचायतींची करडी नजर असणार आहे. यासाठी या ग्रामपंचायतींकडून एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. रस्त्याच्या कडेला आणि मीना नदीत कचरा फेकणाऱ्यांचे फोटो किंवा व्हिडीओ ग्रामपंचायतीला द्या आणि एक हजार रुपये बक्षिस मिळवा अशी ही योजना आहे.
पाच हजारांचा दंड
कचरा फेकणाऱ्यांचे हे फोटो ग्रामपंचायतीच्या वतीनं चौकातील फ्लेक्सवर लावण्यात येणार आहेत. एवढचं नव्हे तर अशा नागरिकांकडून तब्बल पाच हजारांचा दंड करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या या अभिनव उपक्रमामुळे बाहेर उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आळा बसणार आहे. एवढचं नाही तर परिसर स्वच्छ राहण्यास देखील मदत होणार आहे.
दोन्ही ग्रामपंचायतींकडून अगदी वेळेत कचरा गाडी पाठवली जाते. मात्र तरीही शिकली सवरलेली माणसं अशी वागतात तेव्हा डोकं फिरतं. घरातला कचरा अनेकजण कचरा गाडीत न टाकता रात्रीच्या अंधारात किंवा भल्या पहाटे रस्त्याच्या बाजूला बिनदिक्कत फेकून देतात. यामुळे दुर्गंधी पसरते, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येतं. मीना नदीच्या दोन्ही बाजूनं पडलेलं प्लास्टिक आणि कचरा पाऊस पडल्यावर नदीत वाहून जाऊ शकतो. परिसर स्वच्छ ठेवनं हे आपल्या सर्वाचं कर्तव्य आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीकडून हा उपक्रम राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना ग्रामस्थांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.