सुमित सोनवणे, दौंड, 13 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील दौंडमधील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध दौंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या कारवाईमध्ये सहा फायबर बोटी, तीन सेक्शन बोटी असा 1 कोटी 15 लाखाचा मुद्देमाल दौंड पोलिसांनी नष्ट केला आहे. ही कारवाई रात्रीच्या वेळी केल्याने तब्बल 12 तास कारवाईसाठी लागले.
दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांच्या टीमने भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या बोटींवर जाऊन फायबर बोटी नष्ट केल्या. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी रात्रीच्या वेळी भीमा नदी पात्रात सापळा रचून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक कारवाई केल्याने अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, दौंडचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईमध्ये पोलीस हवालदार अण्णासाहेब देशमुख, असिफ शेख, अमोल देवकाते,अमोल गवळी, पांडुरंग थोरात, अमोल राऊत,किशोर वाघ सहभागी होते.
दरम्यान, दौंडमधील भीमा नदी पात्रात गेल्या अनेक वर्षांपासून वाळू माफियांनी थैमान घातलं आहे. कोट्यवधीचा मुद्देमाल नष्ट केल्यानंतर आता तरी या माफियांवरून अंकुश मिळवण्यात पोलिसांना यश येतं का, हे पाहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune news, Pune police