पुणे, 24 मार्च : पुण्यात दहशत राहावी म्हणून काही तरुणांनी तलवारीने १४ हून अधिक गाड्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चार चाकी, दुचाकी अशा विविध गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पुण्यात कोंढवा भागात ही घटना घडलीय.
पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकर नगर मधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी हृषिकेश गोरे (२०), सुशील दळवी (२०), प्रवीण भोसले (१८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
मुंबई, पुण्यासह राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान, कमी दाबाचा पट्टा सक्रीय
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ४ दुचाकींवरून १० ते १२ जण कोंढवा भागात असणाऱ्या टिळेकर नगरमध्ये आले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या तलवार आणि इतर शस्त्रांचा वापर करून परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात ६ चार चाकी, ३ दुचाकी, ३ टेम्पो, १ रिक्षा, १ छोटा टेम्पो अशा एकूण १४ गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांकडून आरोपींना शिवीगाळ करण्यात आली होती. याचा राग मनात धरून आणि परिसरात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर इतरांचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune