'असं झालं तर किती चांगलं होईल...', पुण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त पती-पत्नीची इच्छा

'असं झालं तर किती चांगलं होईल...', पुण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त पती-पत्नीची इच्छा

कोरोनाच्या या संकटामुळे देशभर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, तर काहींच्या आयुष्यावर थेट परिणाम झाला आहे.

  • Share this:

पुणे, 23 मार्च : परदेशातून आलेलं एक संकट एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं, याचा विचार काही महिन्यांपूर्वी कोणीही केला नसेल. पण चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही धडक दिली आहे. कोरोनाच्या या संकटामुळे देशभर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, तर काहींच्या आयुष्यावर थेट परिणाम झाला आहे.

पुण्यातीलही एका दाम्पत्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 14 दिवसांच्या उपचारानंतर आता या दाम्पत्याची प्रकृती स्थिर झाली आहे. 9 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले दाम्पत्य आता पूर्ण बरे झाल्याची माहिती पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या लढाईत पोलीस पत्नींही पाठिशी, सरकारकडून दिरंगाई होत असल्याने एका दिवसांत शिवले 500 मास्क

गेल्या 14 दिवसांपासून त्या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. त्यांनंतर आता केलेली प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. संबंधित दाम्पत्यानंतर आणखी तिघांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. 9 मार्चला ही बातमी समोर आल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

दाम्पत्याची आता आहे ही इच्छा

कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर झालेल्या उपचारानंतर या दाम्पत्याचा प्राथमिक अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता या दाम्पत्याने एक इच्छा बोलून दाखवली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज झाला तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नसेल, असं हे दाम्पत्य सांगत आहे. यादिवशी आम्हाला घरचं जेवण करण्याची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. मात्र त्यांचा अंतिम अहवाल येणं बाकी असल्याने अद्याप त्यांच्या डिस्चार्जबाबत निर्णय झालेला नाही.

First published: March 24, 2020, 4:21 PM IST

ताज्या बातम्या