पुणे, 22 मे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी, यासाठी शासन आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील अनेक भागातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही पुण्यातील कंटेन्मेंट परिसरात अजूनही कडक निर्बंध ठेवण्यात आले आहेत. मात्र असं असलं तरी पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच आता एकाच दिवशी 19 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने पुण्यातील आणखी एक परिसर कंटेन्मेंट घोषित करण्यात आला आहे.
'कोरेगाव पार्कमधील संत गाडगे महाराज वस्ती भागात एकाच दिवसांत 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तातडीने या भागाची पाहणी आयएएस अधिकारी सौरव राव यांच्यासमवेत केली. पाहणीनंतर हा भाग कंटेन्मेंट घोषित करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून उपाययोजनांच्या बाबतीतही संपूर्ण नियोजन केले आहे,' अशी माहिती पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुण्यात आणखी एक भाग हॉटस्पॉट झाल्यानंतर काय उपाययोजना करण्यात आल्या?
- संत गाडगे महाराज वस्ती आणि राजीव गांधी नगर शेजारीच असल्याने एकच रस्ता दोन्हीसाठी उपलब्ध होता. आता दोन्ही भाग वेगवेगळे करण्यात आले आहेत.
- स्वच्छतागृहांचा वापर एकत्रित होत होता. आता दोन्ही भागांचे एक प्रकारे विलगीकरण करत मोबाईल टॉयलेट पुरवण्यात येत आहेत.
- पुणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना जीवनावश्यक किट पुरविले जाणार आहेत.
- या भागातील संशयितांचे स्वाब घेण्याची सोय शेजारीच असलेल्या संत गाडगे महाराज शाळेत करण्यात आली आहे.
- आजवर 70 नमुने घेण्यात आले असून 250 पर्यंत नमुने घेण्याचे नियोजन आहे.
- 50 वर्षांवरील आजाराची पार्श्वभूमीवर असणाऱ्या नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
- महापालिकेच्या कस्तुरबा गांधी शाळेत क्वारन्टाइनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. शिवाय वाडिया कॉलेजचा पर्यायही उपलब्ध केला आहे.
- भागातील स्वच्छतेसाठी 11 सफाई सेवक नव्याने भरले जात आहेत.
दरम्यान, पुणे शहरात संध्याकाळी सात ते सकाळी सात यावेळेत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. 31 मे पर्यत ही संचारबंदी असणार आहे. सहपोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत पुणे शहर, पुणे आणि खडकी कॉटेन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. संचारबंदी आदेशानुसार रस्त्यावर वाहन आणणे, रस्त्यावर उभे राहणे यास सक्त मनाई आहे. संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
संकलन, संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.