Home /News /pune /

पुण्यासह राज्यभरातून आनंदाची बातमी, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासादायक आकडेवारी

पुण्यासह राज्यभरातून आनंदाची बातमी, सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासादायक आकडेवारी

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे, 29 सप्टेंबर : राज्यासोबतच पुण्यातही कोरोनाचा आलेख घसरू लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी रूग्णवाढीची संख्या एक हजाराच्या खाली राहिलेली आहे. याआधी दररोज किमान दीड ते 2 हजार रूग्ण वाढायचे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्ण संख्येचा उंचावलेला आलेख आता खाली येताना पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 17 सप्टेंबरला अॅक्टिव्ह रूग्णसंख्या ही तब्बल 3 लाख 17 हजारांवर पोहोचली होती. तीच आता 2 लाख 65 हजारांपर्यंत खाली आली आहे. तसंच मृत्यूदरही साडेचार टक्क्यांवरून 2.65 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. महिन्याभरापूर्वी राज्यात दररोज 25 हजार नवे रूग्ण आढळून यायचे. तोच आकडा आता थेट 11 हजारांपर्यंत घसरला आहे. राज्यातील बरे होण्याचं प्रमाणही तब्बल 77 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे. गेल्या महिन्याभरात तर तब्बल 5 लाख रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. थोडक्यात आजमितीला राज्यातील कोरोनाची रूग्णसंख्या ही 13- 14 लाख दिसत असली तरी त्यापैकी तब्बल 10 लाख रूग्ण हे कोरोना मुक्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा हा घसरता आलेख पुढचे तीन-चार आठवडे असाच कमी होत राहिला तर नक्कीच आपण कोरोनावर यशस्वीपणे मात करू शकू. पण त्यासाठी नागरिकांनी मास्क, सँनिटायझर आणि सोशल डिस्टेंस ही त्रिसूञी यापुढेही पाळणं तितकंच महत्वाचं आहे, असं मत राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्यात आज सलग दुसऱ्यांदा नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. दिवसभरात 14 हजार 976 रुग्णांची नोंद झाली असून 19 हजार 212 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज 78.26 टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत 10 लाख 69 हजार 159 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 2 लाख 60 हजार 363 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या