पुणेकरांसाठी पुढील 8 दिवस महत्त्वाचे, अजित पवारांनी दिले कठोर निर्देश

पुणेकरांसाठी पुढील 8 दिवस महत्त्वाचे, अजित पवारांनी दिले कठोर निर्देश

पुण्यात वाढत जाणारे कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यू दर पाहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

  • Share this:

पुणे, 18 एप्रिल: पुण्यात वाढत जाणारे कोरोनाबाधित रुग्ण व मृत्यू दर पाहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली.

हेही वाचा..

अजित पवार म्हणाले, पुण्यात वाढणारे कोरोनाबाधित रुग्ण ही चिंतेची बाब आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यास प्रतिबंधीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती आम्ही देण्यास तयार आहोत. पोलीस प्रशासनाने पाहिजे तर कठोर धोरण अवलंबवावे. त्यासाठी 8 दिवस कठोर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. यासाठी नागरिक निश्चितच सहकार्य करतील.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा अत्यंत तत्पर आणि सक्षम करण्यात येईल, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, ससून रुग्णालयाच्या नवीन 11 मजली इमारतीची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन समितीमधून 25 टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार शासनाने यापूर्वीच दिले आहेत.

हेही वाचा..

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कन्टेंन्टमेंट झोन परिसरात कडक निर्बंध घालण्यात यावेत. या भागातील नागरिकांना वारंवार ये- जा करता येणार नाही. त्याचबरोबर या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य परिसरात स्वच्छेतेची विशेष दक्षता बाळगावी. येथील नागरिकांना फ्ल्यू सदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. तसेच रॅपीड टेस्टमार्फत देखील संभाव्य रुग्ण शोधण्यावर भर द्यावा. हॉटस्पॉट असणाऱ्या ग्रामीण भागात देखील कडक निर्बंध अवलंबवावे लागणार आहेत. कोल्हापूर आणि पिंपरी चिंचवडमध्ये तयार करण्यात आलेल्या ॲपच्या धर्तीवर पुण्यातही असा उपक्रम राबवावा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा,..

पोलिसांच्या आरोग्य विषयक सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीवर भर द्यावा. तसेच पोलीसांना एन-95 मास्क व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन द्यावीत. शहर आणि ग्रामीण भागातील मजुरांसाठी कम्युनिटी किचन सुरु करावेत. यासाठी शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा. रेशन दुकानांव्दारे धान्य वितरण सुयोग्य व सुनियोजीत करण्यात यावे. कोणीही अन्नधान्यापासून वंचीत राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. त्यासाठी मार्केट कमिट्या, सहकारी संस्थांनी पुढे यावे आणि अर्थ सहाय्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 18, 2020, 8:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या