राज ठाकरेंकडून 'राजमुद्रे'चा गैरवापर, मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंकडून 'राजमुद्रे'चा गैरवापर, मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल

मनसेने पक्षांच्या झेंड्यावरील राजमुद्रा तात्काळ हटवली नाहीतर थेट रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं उत्तर दिलं जाईल

  • Share this:

पुणे,23 जानेवारी: मुंबईस राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरू आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी 10 वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 'राजमुद्रा' असं याचं स्वरूप आहे.

दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडने मनसेच्या नव्या झेंड्याला कडाडून विरोध केला आहे. राज ठाकरेंकडून शिवराजमुद्रेचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये मनसे आणि राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.'राजमुद्रे'चा गैरवापर करून मताचा जोगवा आम्ही मागू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे. मनसेने पक्षांच्या झेंड्यावरील राजमुद्रा तात्काळ हटवली नाहीतर थेट रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं उत्तर दिलं जाईल, अशा इशारा देखील संतोष शिंदे यांनी दिला आहे. मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरण्यास सर्वात आधी आक्षेपही संभाजी ब्रिगेडनेच घेतला होता. त्यामुळे आगामी काळात राज्यात मनसेविरूद्ध संभाजी ब्रिगेड असा संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीने केला पहिला घणाघाती हल्ला

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर मनसे आता आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादीने राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

'कोणता झेंडा घेऊ हाती, अशी अवस्था राज ठाकरे यांची झाली आहे. शाडो कॅबिनेट म्हणजे लहान माझी बाहुली तिची मोठी सावली असा प्रकार आहे. सभांना जमणारी गर्दी कार्यकर्त्यांमध्ये कशी रूपांतरित होईल यासाठी राज ठाकरे यांनी प्रयत्न करावेत. एकांगी कारभार करायची सवय असेल तर पदाधिकाऱ्यांची फळी उभी राहत नाही हे गणित राज ठाकरे यांनी समजून घ्यावे,' असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हेमंत टकले यांनी लगावला आहे.

मनसेच्या नव्या अवतारावर काय आहे काँग्रेसची प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला अजेंडा बदलण्याचं निश्चित केल्यानंतर त्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'मनसेनी पक्षाच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर करणं गैर आहे. अमित ठाकरे यांची राजकारणात झालेली एण्ट्री हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, कोणास संधी द्यावी हे त्यांनी ठरवावे,' अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

'राज'पुत्राची राजकारणात एण्ट्री!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरेंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

'27 वर्षांत पहिल्यांदाच मी जाहीर व्यासपीठावर बोलत आहे. तुम्ही सर्वांनी आज आणि याआधीही मला जे प्रेम दिलं आहे, ते भविष्यातही द्याल, यासाठी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो,' असं म्हणत अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

First published: January 23, 2020, 2:41 PM IST

ताज्या बातम्या