पिंपरी चिंचवड, 03 ऑगस्ट : पिंपरी चिंचवड शहरातील एका उड्डाणपुलावर अंधश्रद्धा वाढविण्याच्या उद्धेशाने नारळ,लिंब, केळी ठेवल्याचा अजब प्रकार आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, फ्रेंडशिप डेच्या पूर्व संध्येला हा प्रकार घडला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य आकर्षण असलेला आणि शहरतील अनेक नगर जोडणारा पुणे-मुंबई जुना महामार्गावर कासारवाडी परिसरात उभारण्यात आलेल्या भारतरत्न JRD टाटा उड्डाण पुलावर हा प्रकार घडला आहे.
या पुलाचा एक भाग पिंपळे सौदागर हा अत्यंत उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू परिसरात उतरतो. या परिसरातील शेकडो नागरिक आणि खास करून तरुण तरुणींची मोठी वर्दळ असते.
या पुलावर मध्यभागी एक दारुची बाटली,3 लिंबू आणि 3 केळी ठेवण्यात आल्या होत्या. सुरुवातीला लोकांना वाटलं हे साहित्य कुणाच्या तरी पिशवीतून पडल्या असाव्यात. पण, ज्या पद्धतीने याची मांडणी केली होती ते पाहून नागरिकांना संशय बळावला. हा प्रकार पाहुन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
अयोध्येतील राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, भिडे गुरुजींची मागणी
फ्रेंडशिप डे सारखे दिवसही इथे साजरे केले जातात आणि त्यासाठी म्हणून एखाद्या तरुणाने हा प्रकार केल्याची शंका व्यक्त करत पुलावर कुणी तरी नारळ, लिंब दारूची बाटली आणि केळी ठेवल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्ते राजू कदम यांना नागरिकांनी दिली. ते तिथे तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी हा प्रकार केवळ थोतांड असल्याचं सांगत सगळ्या वस्तू उचलून सोबत नेल्या.
सुशिक्षित शहरातही असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात घबराहट पसरली होती. मात्र, हे केवळ अंधश्रद्धा असून त्यावर विश्वस ठेऊ नका, असं आवाहन राजू कदम यांनी केलं.