पुणे, 3 फेब्रुवारी : नुकताच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला. पाच पैकी तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. या निकालावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
मी आधीच सांगितलं की आम्ही निवडणुकीमध्ये उत्तम प्रकारे लढलो. मात्र भाजप हारली असा रंग दिला जात आहे. अमरावतीमध्ये झालेल्या पराभवाचं आम्ही चिंतन करू, त्यावर अभ्यास करू. तिथे पराभव व्हायला नको होता. अमरावतीमध्ये आम्ही मागे पडलो अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
हेही वाचा : MLC Election: अमरावतीमध्येही भाजपला धक्का; मविआचे धिरज लिंगाडे विजयी
सत्यजित तांबेंवर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी त्यांनी सत्यजित तांबे यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांनी आता निर्णय घ्यावा, आम्ही त्यांना कुठलीही ऑफर देणार नाहीत. सत्यजित तांबे यांना आमच्याकडे यायचं असेल तर ते येतील असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती कधी? अमरिंदर सिंग यांचा मोठा खुलासा
'भाजप राणेंच्या पाठिशी'
तसेच संजय राऊत यांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे. मात्र भाजप ठामपणे नारायण राणे यांच्या पाठिशी असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.