पुणे, 25 डिसेंबर : गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुण्यातील कोथरुड मतदार संघातून निवडणूक लढवली होती. कोल्हापूर सोडून पुण्यातला सुरक्षित मतदारसंघ निवडल्याच्या कारणावरून विरोधकांकडून त्यांना कायम लक्ष्य केलं जातं. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आता पुणं सोडून कोल्हापूरात परत जाणार असल्याचं सांगितलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात त्यांंनी तसं वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विरोधकांचा उल्लेख करत ते पुण्यातच असं म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'पुणे हे शहर असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्रजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: ही गोष्ट मला विरोधकांना सांगायची आहे.'
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा हा निर्णय अनेकांना मानवला नव्हता. त्यांच्यासाठीही ती दुखरी नस ठरली.
विरोधक नेहमी त्यांना याच मुद्द्यावरून टोमणे मारत होते. त्यामुळं चंद्रकांत पाटलांनी आता विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. मी आजही कोल्हापूरमधून निवडणूक लढवायला तयार आहे. जर कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं वक्तव्यही चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी केल होतं.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूडमधून निवडणूक लढवल्यामुळं तेथिल तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. कोथरूड मतदारसंघातल्या उमेदवारीवरून मेधा कुलकर्णी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही बिनसलं होतं. अलिकडेच महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांना केंद्रातील महत्त्वाची जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यांच्या वादावर तूर्तास तरी पडदा पडला आहे. तसेच मेधा कुलकर्णी यांना केंद्रातील कोणती जबाबदारी मिळणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrakant patil, Kolhapur, Politics, Pune