हळदीसाठी मुंबईवरून पुणे जिल्ह्यात आले, 3 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर गावाची झोप उडाली

हळदीसाठी मुंबईवरून पुणे जिल्ह्यात आले, 3 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर गावाची झोप उडाली

प्रशासनाने या गावांच्या हद्दीदेखील सील करून संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना क्वारन्टइन करून घेतले आहे.

  • Share this:

आंबेगाव, 24 मे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज तब्बल तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये निरगुडसर,जवळे आणि शिनोली गावांचा समावेश आहे. तपासणी दरम्यान हे तिघेपण पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असून प्रशासनाने या गावांच्या हद्दीदेखील सील करून संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीना क्वारन्टइन करून घेतले आहे. तसंच त्यांची देखील तपासणी करणार असल्याचे सांगितलं आहे.

मुख्य म्हणजे हे सर्व रुग्ण मुंबईवरून गावी आले आहेत. यातील निरगुडसर येथील आढळून आलेला रुग्ण पोलीस खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. पुतणीच्या लग्नासाठी ते घटकोपरहून कुटुंबासह गावी आले होते. तसंच धक्कादायक बाब म्हणजे ते हळदीच्या कार्यक्रमात सर्वजण एकत्र होते.

या घटनेमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गावकऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या असून हळदी समारंभाला उपस्थित असलेल्या 61 जणांना होम क्वारन्टाइन करण्याचे नियोजन केले आहे. साकोरे येथील रुग्ण भाजीपाला विक्रेता तर शिणोलीचा रुग्ण ड्रायव्हर आहे.

आंबेगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 झाली आहे. याआधी साकोरे व शिणोली गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, सुरुवातील पुणे शहरापुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही वाढू लागला आहे. पुणे जिल्ह्यात 188 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आता कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 5616 वर पोहोचली आहे. तसंच आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 24, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading