पुणे, 9 डिसेंबर : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह हे पुण्यात येणार आहेत. पुण्यात 11 ते 15 जानेवारीदरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 15 जानेवारीच्या फायनलचं आमंत्रण बृजभूषण सिंह यांनी स्वीकारलं आहे. या कार्यक्रमासाठी ब्रृजभूषण सिंह 14 तारखेला पुण्यात येणार आहेत.
मुख्य म्हणजे बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याला मनसेकडून मात्र विरोध होणार नाही. मनसे ब्रृजभूषण सिंह यांना कोणताच विरोध करणार नाही. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यासंदर्भातले आदेश दिले आहेत, असं मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी आदेश दिला आहे म्हणून, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता, असंही वसंत मोरे सांगायला विसरले नाहीत.
शरद पवारही व्यासपीठावर
बृजभूषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर असणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा वाद शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांनी मिटवला होता. यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांना कुस्तीगीर परिषदेचं अध्यक्ष करण्यात आलं. शरद पवार या परिषदेचे चीफ पेट्रेन आणि बाळासाहेब लांडगे पेट्रन आहेत.
राजकारण काय?
बृजभूषण सिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार आहेत. राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जायची घोषणा केल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरेंचा उत्तर भारतीय विरोध बघता त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा बृजभूषण सिंह यांनी घेतला होता. यानंतर राज ठाकरेंची प्रकृती बिघडली आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे त्यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला.
मनसे हा पक्ष कायमच आक्रमक आंदोलनासाठी ओळखला जातो. नेहमीच खळ खट्ट्याकची भाषा करणारी मनसे यावेळी मात्र बॅकफूटवर का गेली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांच्यातली जवळीक वाढत आहेत, असं असलं तरी भाजपचेच खासदार असलेले बृजभूषण सिंह राज ठाकरेंना थेट विरोध करतात. आता हेच बृजभूषण महाराष्ट्रात येत असूनही मनसे शांत राहणार आहे, त्यामुळे यामागे नेमकं कोणतं राजकारण आहे? कुस्तीच्या मैदानात हा राजकीय डाव नेमका कुणी टाकला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray, Sharad Pawar