पुणे, 24 डिसेंबर : Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे 9 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. नोव्हेंबर- डिसेंबरमध्येच शाळा उघडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार पुण्यात काही शाळा सुरूही झाल्या होत्या, पण पुन्हा एकदा पुणे परिसरात कोरोना रुग्ण (Covid-19) वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. आता येत्या 4 जानेवारीपासून शाळा ठराविक इयत्तेतल्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधांचं पालन करून उघडणार आहेत. या संदर्भातले सुधारित आदेश महापालिकेने काढले आहेत.
महापालिकेने काढलेल्या सुधारित आदेशानुसार, 4 जानेवारीपासून इयत्ता 9 ते 12 वी चे वर्ग सुरू होतील. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असेल. या कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करूनच शाळा उघडणार आहेत. शाळा उघडण्यापूर्वी शिक्षक आणि स्टाफची कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचंही पालिकेने कळवलं आहे. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे पालकांनी लेखी संमतीपत्र दिलं तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल. अन्य वर्गांसाठी ऑनलाइन क्लास पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.
गेल्या महिन्यात शाळांबाबत असेच आदेश काढण्यात आले होते. पण ते मागे घेण्यात आले आणि पुन्हा शाळा बंद झाल्या. आता ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या स्वरूपातील कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे शाळा उघडण्यास आणखी विलंब होतो की काय अशी चर्चा होती. तूर्तास तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नव्या विषाणूची दहशत
ब्रिटनमध्ये (Britain) आढळलेल्या नव्या कोरोनाची (corona new strain) धास्ती संपूर्ण जगानं घेतली आहे. भारतासह अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. राज्य सरकारनं रात्रीच्या वेळी संचारबंदी जारी केली आहे. शिवाय आता गेल्या महिनाभरात ब्रिटनमधून आलेल्या नागरिकांची यादी राज्य सरकारनं तयार केली आहे. त्यामध्ये कल्याणमधील नागरिकांचाही समावेश आहे.
25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत 45 नागरिक ब्रिटनमधून कल्याणमध्ये परतले आहेत. त्यांच्या नावाची यादी राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द केली आहे आणि या सर्वांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.