पुणे, 25 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण तिथे राहत होती तिथे जाऊन पाहणी केली. यावेळी पुणे वरिष्ठ पोलीस अधिकारी लगड यांच्याशी बाचाबाची झाली. पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केला नाही, लगड हे अत्यंत रगेल अधिकारी आहे, त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीच वाघ यांनी केली.
चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांवर घणाघाती आरोप केला.
'वानवडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक लगड हे मग्रूर आहे. त्यांना हे प्रकरण रफा दफ करण्यासाठीच त्यांना तिथे बसवलं. त्यांचा कुणीतरी मोठा बाप आहे तिथे तो त्यांना सांगत असावा तू घाबरु नको. पोलीस निरीक्षक सांगताहेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाहीत. पण पूजा चव्हाणसोबत तिकडे राहणाऱ्या दोन जणांचे काय ते पोलिसांच्या ताब्यात का नाहीत' असा सवाल वाघ यांनी केला.
वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इतक्या रगेल पद्धतीने वागले की, पोलीस महासंचालक सुधा इतक्या संवेदनशील प्रकरणात बोलत नाहीत. हत्यारा संजय राठोड याला वाचवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जाणार आहात, अशी टीकाही वाघ यांनी केली.
'आई वडिलांची तक्रार नाही म्हणून गुन्हा दाखल होत नाही. पण ज्या 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत, त्याच्या चौकशीच्या काय झालं. अरुण राठोडला फोन केला होता. त्याचं काय झालं. फोन संजय राठोड करत होते असा माझा आरोप आहे, असंही वाघ म्हणाल्या.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामध्ये पीडित मुलीने तक्रार मागे घेतली होती. पण या प्रकरणामध्येही सरकारने गुन्हा का दाखल केला नाही. त्या प्रकरणाचा नाव घेऊन तुम्ही आमचा आवाज दाबणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. आम्हाला राज्याच्या संवेदनशील मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा हे, बलात्कारी आणि हत्यार संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा. महाराष्ट्रात आता मंत्रीच बायका पोरींवर अन्याय करत आहेत. ही मोगलाई नाही शिवशाही आहे, हे कृतीतून दाखवून द्या, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.
जर इथे न्याय नाही मिळाला तर आम्ही न्यायालयात जाण्याची आमची पुढची रणनीती असेल. हे प्रकरण घडलं तेव्हा गृहमंत्र्यांना कोरोना होता. पण गृहराज्यमंत्री का नाही बोलले, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.