पुणे, 9 डिसेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना ब्रिजभूषण सिंह यांच्या हस्ते लावण्यात येणार आहे, त्यानिमित्त आगामी काही दिवसात ब्रिजभूषण पुण्यात येतील.
ब्रिजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्याबाबत मनसे काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. आता मनसे ब्रिजभूषण सिंह यांना कोणताच विरोध करणार नाही. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यासंदर्भातले आदेश दिले आहेत, असं मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी आदेश दिला आहे म्हणून, अन्यथा आम्ही त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता, असंही वसंत मोरे सांगायला विसरले नाहीत.
वसंत मोरे यांची मनसेतून हकालपट्टी होणार, राज ठाकरेंनी नाकारली भेट
काय आहे वाद?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्याला जायची घोषणा केली होती, पण भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरेंच्या प्रकृतीच्या समस्येमुळे ते अयोध्या दौऱ्यावर गेले नव्हते. शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता.
दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येण्याआधी बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी महाराष्ट्रात जरूर जाईन, राज ठाकरेंचेही धन्यवाद त्यांनी कार्यकर्त्यांना विरोध करू नका म्हणून सांगितलं आहे. माझा राज ठाकरेंना विरोध तात्विक आहे,' असं बृजभूषण सिंह म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray