इंदुरीकर महाराजांवर उठली टीकेची झोड, मात्र भाजप आमदाराचा जाहीर पाठिंबा

इंदुरीकर महाराजांवर उठली टीकेची झोड, मात्र भाजप आमदाराचा जाहीर पाठिंबा

आमदार महेश लांडगे यांनी इंदुरीकरांना समर्थन देतानाच त्यांची आपल्या बैलगाडीतून मिरवणूकही काढली.

  • Share this:

गोविंद वाडके,(प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड,17 फेब्रुवारी: हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असताना आता या वादाला राजकीय रंग चढू लागला आहे. तुमचा प्रत्येक लढा आमचा आहे आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू,असं सांगत भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी इंदुरीकर यांना जाहीर पाठींबा दर्शवला आहे.

आमदार महेश लांडगे यांनी इंदुरीकरांना समर्थन देतानाच त्यांची आपल्या बैलगाडीतून मिरवणूकही काढली. इंदुरीकर करत असलेल्या प्रबोधानच्या कार्याचा अभिमान असल्याचेही सांगायला आमदार लांडगे विसरले नाहीत. मात्र इंदुरीकरांना पाठींबा दर्शविणारे आमदार लांडगे माध्यमांसोमर येणे टाळले. त्यामुळे इंदुरीकर गर्भलिंग निदानाबाबत करत असलेले वक्तव्य किंवा प्रबोधनाबाबत आमदार लांडगे यांची भूमिका काय, हे मात्र समजू शकले नाही. मात्र एकूणच आता या प्रकरणी भाजपने इंदुरीकर महाराजांना समर्थन देण्याची भूमिका स्पष्ट झाल्याने इतर पक्ष काय मागणी करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

3 दिवस फिरकू नका..

दरम्यान, सोमवारी पिंपरी-चिंचवड जवळील मोशी गावामध्ये इंदुरीकरांच्या कीर्तनाच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी कीर्तन सुरू करण्याआधीच तिथे उपस्थित असलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना आपण लोटांगण घालत असल्याचे सांगत चित्रिकरण बंद करण्याची विनंती केली. इंदुरीकरांनी केलेल्या या आवाहनानंतर तिथे जमलेल्या गावकऱ्यांनीही माध्यमांकडून केले जाणार चित्रिकरण बंद पाडले. या प्रकारामुळे तिथे काही काळ तणाव पसरला होता. एकीकडे समाज प्रबोधन करणारे इंदुरीकर आता माध्यमाहून प्रबोधन करायला का हरकत घेत आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते अजूनही खुलासा का देत नाहीत,असे अनेक प्रश्न इंदुरीकर घेत असलेल्या भूमिकेमुळे निर्माण झाले आहेत.

इंदुरीकर महाराज कायदेशीररित्या बाजू मांडणार

आपल्या खुमासदार कीर्तनातून श्रोत्यांना प्रबोधन करत भागवत धर्माचे विवेचन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे सध्या आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यातून अडचणीत आले आहेत. 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते' स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात, असं विधान इंदुरीकर यांनी एका व्हिडिओमध्ये केल्याचं दिसलं होतं. त्यांनी केलेलं वक्तव्य पीसीपीएनडिटी अॅक्ट अर्थात प्रसुतीपुर्व गर्भलिंग परीक्षण प्रतिबंध कायद्यानुसार अपराध असून त्याबद्दल त्यांना शासनाच्या पीसीपीएनडिटी अहमदनगरच्या सल्लागार समितीने नोटीस काढली आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराजांवर विविध भागातून विरोध दर्शविला जात आहे. तर दुसरीकडे त्यांच्या भक्तांनी महाराजांवरील आरोपावर निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणीही मोर्चा, आंदोलन काढू नये असं म्हटलं आहे. वारकरी हा शांतताप्रिय संप्रदाय आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं काही करू नये. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी आपण शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले?

'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.'

First published: February 17, 2020, 3:28 PM IST

ताज्या बातम्या