पुणे, 1ऑक्टोबर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर पार्थ पवारांची 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल सुरू असल्याचं सूचक वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी सस्पेन्स वाढवला आहे. मात्र, पार्थ यांना भाजपत प्रवेश देणार का? यावर सावध भूमीका घेत अद्याप प्रस्ताव आला नाही, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला.
हेही वाचा...भाजपला धक्का! महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, या नगरपरिषदेवर मिळवला ताबा
दरम्यान, पार्थ यांच्याबाबत सूचक आणि सावध बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरही कठोर शब्दांत टीका केली. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येणं शक्य नाही. तसेच आरक्षण हा राज्याचा प्रश्न आहे. हे 50 वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही. हे त्यांचं अज्ञान असं म्हणणं धाडसाचं ठरेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
पुणे पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाची आज सुरूवात झाली. चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यावेळी उपस्थित होती. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुका कोरोनामुळे कधी होतील, हे माहीत नाही. मात्र, भाजपनं तयारी सुरू केली आहे. निवडणूक जिंकता येणं हा उमेदवारीबाबत महत्त्वाचा निकष राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
बीडमधील विवेक कल्याण राहाडे या तरुणाची आत्महत्या दुर्दैवी आहे. कुणी जीवाचा अंत करू नये, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
पार्थ यांच्या या मागणीलाही कवडीची किंमत देणार का?
दुसरीकडे, पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे विरोधी पक्षानं मात्र स्वागत केलं आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या या विधानाला पाठिंबा दिला आहे. मात्र, पार्थ पवार यांनी केलेल्या या मागणीला महाविकास आघाडी गंभीर दखल घेत किंमत देणार का? की कवडीची किंमत देणार?' असा बोचरा सवाल राम कदम यांनी केला आहे.
हेही वाचा...आपण नक्की जिंकू...आत्महत्या हा पर्याय नाही, संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन
दरम्यान, राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे. याच मुद्द्यावरून बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली आहे. याच घटनेवर पार्थ पवार यांनी ट्वीट केलं होतं. अशा दुर्देवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जागं व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं, असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप नेत्यांना सरकारवर टीका करण्याची आयती संधी चालून आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Chandrakant patil, Parth pawar, Sharad pawar