'तुम्ही फडणवीस यांना टरबुज्या आणि मला चंपा म्हणता ते चालते का?'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे.

  • Share this:
पुणे, 22 नोव्हेंबर : 'माझं कालचं वक्तव्य हे ओबीसी आरक्षणासंदर्भातील होते. शरद पवार यांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता. पवार साहेबांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते. मात्र तुम्ही मोदींवर, अमित शहांवर बोललेले चालते. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणतात ते चालते, मला चंपा म्हणतात ते चालते का?' असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर अजित पवारांनी जोरदार पलटवार केला होता. 'शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. पवार साहेबांवर बोलण्या इतकी आपली किंमत आहे का? काहीजण अतिशय खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत,' असं अजित पवार म्हणाले होते. त्याला आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'ट्रोल करण्यासाठी पेड टीम तयार' 'अजित पवार महाराष्ट्राच्या प्रश्नावर कधी बोलत नाहीत आणि यावर बोलायला त्यांना वेळ कसा मिळाला? ज्यांचा झेंडा एक नाही, ज्यांचे विचार एक नाहीत ते मांडीला मांडी लावून बसले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे. या सरकारमध्ये प्रचंड गोंधळ आहे, शाळांच्या बाबतीत एकमुखाने निर्णय होत नाही. मुलांच्या मनाशी हे सरकार खेळत आहे. यावर काही बोलले तर ट्रोल करण्यासाठी त्यांची पेड टीम तयार आहे.. ट्रोलला आम्ही घाबरत नाही,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मी माझी बाजू मांडली, माझ्या दृष्टीने हा विषय संपला, त्यांना यावर बोलायचं असेल तर बोलत राहू दे, असंही पाटील म्हणाले. राज ठाकरेंसोबत भाजपची युती शक्य? 'राज ठाकरे अतिशय तळमळीने समाजातील प्रश्नावर बोलतात. पण जोपर्यंत ते आपले परप्रांतीयांच्या बाबतीतील आपली भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना घवघवीत यश मिळणार नाही. राजकारणात त्यांना खूप यश मिळेल. परंतु जोपर्यंत ते परप्रांतीयांच्या बाबतीतली आपली भूमिका बदलत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीवर भाष्य केलं आहे.
Published by:Akshay Shitole
First published: