पिंपरी, 20 मार्च: पिंपरी चिंचवडमध्ये भाजप पक्षात (BJP) सरळ सरळ फुट पडताना दिसत आहे. महापालिकेतील अनेक महत्त्वाच्या पदांमुळे भाजप पक्षात गटबाजी पाहायला मिळत आहे. भाजपचा हा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याचं दिसत आहे. पिंपरीतील भाजपचे नगरसेवक रवी लांडगे (BJP Corporator Ravi landge) यांनी बंडाचं निशाण खांद्यावर घेतलं आहे. त्यांनी पिंपरीत बॅनर (Banner) लावून भाजपातील वरिष्ठ नेत्यांना सवाल केला आहे. गेल्या 40 वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ राहिलो, त्यामुळे माझं अथवा माझ्या कुटुंबीयांचं काही चुकलं का? असा थेट सवाल भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी विचारला आहे. त्यामुळे भाजपच्या गोठात खळबळ उडाली आहे.
खरंतर भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांचे वडिल बाबासाहेब लांडगे आणि चुलते अंकुशराव लांडगे यांनी पिंपर चिंचवड मध्ये भाजपचा विस्तार केला आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते भाजपाशी एकनिष्ठ राहिले आहेत. असं असताना महापालिकेच्या महत्त्वाच्या जागांवर त्यांना डावलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या मनातील खल बॅनरबाजीमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यांनी बॅनरमध्ये माझं आणि आमच्या कुटुंबीयांच काही चुकलं का? असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
2017 सालच्या निवडणूकीत भाजपकडून बिनविरोध निवडूण येणारे एकमेव नगरसेवक म्हणून रवी लांडगे यांची ओळख आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील तरुण वर्गही त्यांच्या पाठिशी आहे. असं असतानाही गेल्या चार वर्षांपासून महानगर पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरही त्यांच्या वाट्याला कोणतचं महत्त्वाचं पद आलं नाही. त्यामुळे त्यांनी नाराज होऊन ही बॅनरबाजी केली आहे. खरंतर स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निष्ठावंत गटातून त्यांची उमेदवारी पक्की समजली जात होती. मात्र ऐन वेळी त्यांना डावलण्यात आलं आहे. एक महिन्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती, या कारणामुळे त्यांची दावेदारी नाकारल्याची चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे.
हे ही वाचा -भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार, कोथरुडमध्ये खळबळ
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, स्थायी समितीचं अध्यक्ष पद हुकल्यानंतर नाराज लांडगे याचं नाव उपमहापौर पदासाठी पुढे करण्यात आलं होतं. मात्र यावेळी त्यांनी या पदाला नकार दिला. त्यामुळे भाजप नगरसेवक रवी लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली. त्यामुळे रवी लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात बॅनरबाजी करत स्थानिकाच्या भावनेला हात घातला आहे. त्यांनी बॅनरमध्ये म्हटलं की 'आमचं कुटुंब गेल्या 40 वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ राहिलं आहे. सोयीनं नाही, तर स्वाभिमानानं राजकारण केलं आहे, यामुळं आमचं काही चुकलं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Pimpari chinchawad