पिंपरी चिंचवड, 16 डिसेंबर: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ घालत तोडफोड केली. एवढंच नाही तर आपल्याच अध्यक्षाला टार्गेट केल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे भाजपच्या नगरसेवकांनी केलेला गोंधळ पाहून आजच्या सभेत राष्ट्रवादी-शिवसेना नगरसेवकांनी सावध भूमिका घेत चक्क डोक्यात हेल्मेट घालून सभागृहात प्रवेश केला.
हेही वाचा...पीडितेची तक्रार न घेता धमकावलं, हवालदारानंच मध्यरात्री पाठवले अश्लिल मेसेज
'पार्टी विथ डिफरन्स' असं म्हणाणारे भाजपच्या नगरसेवकांनीच सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केली. इतकंच नाही तर फोन, माईकची तोडफाड करून स्थायी समितीच्या बैठकीत तोडफोड केली. भरसभेत विकास कामाच्या फाईल्स भिरकावल्या. आयुक्त आणि सभापती आपलं म्हणणं ऐकत नसल्यानं आपप असा राडा केल्याचा दावा भाजपच्या राडेबाज नगर सेवकांनी केला आहे.
मागील स्थायी समितीच्या सभेदरम्यान भाजप नगर सेवकांनी गोंधळ घालत तोडफोड केल्यामुळे आजच्या सभेत राष्ट्रवादी- शिवसेना सदस्य हेल्मेट घालून केला प्रवेश pic.twitter.com/zK0iknSlE1
— sachin salve (@SachinSalve7) December 16, 2020
मात्र, हा गोंधळ नियोजित असल्याचं सांगत विरोधकांनी सडकून टीका केली आहे. या राडेबाजीमुळे भाजपचं पितळ उघडं पडलं असल्याचं नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.
मात्र, वरकरणी हा वाद जरी स्थायी समितीच्या बैठकीतील वाटत असला तरी त्याला भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या संघर्षाची किनार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ज्या नगरसेवकांनी गोंधळ घातला ते सर्व सदस्य भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाचे आहेत. तर स्थायी समितीचे सभापती संतोष लोंढे हे महेश लांडगे गटाचे आहेत. मात्र भरसभेत वस्त्रहरण होऊन देखी पक्षात सर्व आलबेल असल्याचा दावा स्थायी सभापती संतोष लोंढे यांनी केला आहे.
हेही वाचा..3 महिन्यांपासून पगार नाही, कसं जगायचं? पुणे कोविड सेंटरमधील योद्धा रस्त्यावर
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एक हाती सत्ता मिळवून भाजपला आता तीन वर्षे होत आहेत. मात्र, तरी देखील त्यांना सत्तेचा गाडा नीट हाकता आला नाही. हे याआधीही स्पष्ट झालं होतं. त्यात आता आणखी या गोंधळामुळे भर पडली आहे. पक्षाची प्रतिमा मलिन करणारे असे नगरसेवक असल्यानं पुढील काळात पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपला 'बुरे दिन' येण्याची शक्तता नाकारता येत नाही, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.