पुणे, 15 डिसेंबर : माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना अटक करण्यात आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादातून दुचाकीस्वाराला जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून ते भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावईदेखील आहेत.
अटक टाळण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून छातीत दुखत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी ससून रुग्णालयात तपासणी करून त्यांना रिसतर अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. शहरातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याबाबत अमन अजय चड्डा यांनी फिर्याद दिली होती. किरकोळ अपघाताच्या वादातून जाधव यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप अमन अजय चड्डा यांनी केला आहे.
दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. मनसेकडून आमदार झालेल्या जाधव यांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तिथंही मतभेद झाल्यानंतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. हर्षवर्धन जाधव हे त्यांच्या कौटुंबिक कलहामुळेही कायम चर्चेत असतात. सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर आगपाखड करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.