पुणे, 12 मे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांना घरात थांबावं लागलं. घराबाहेर पडता येत नसल्याने अनेकांना आपले शौक पूर्ण करण्यास अडथळे येऊ लागले. मद्यप्रेमी...तळीराम अशा विविध नावांनी ओळखले जाणारेही याला अपवाद नाहीत. दारूच्या शोधात या तळीरामांनी काही ठिकाणी दारुची दुकाने फोडल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी सरकारने निर्बंध शिथिल करत दारू विक्रीला परवानगी दिली.
सरकारने दारू विक्रीला परवानगी देताच मद्यप्रेमींना आभाळ ठेंगणं झालं आणि दारूच्या दुकानाबाहेर मोठी झुंबड उडाली. लोकांनी अक्षरश: रांगा लावत दारू खरेदी केली. मात्र कोरोना व्हायरचं संकट अजूनही कायम असताना अशा रांगा आणि त्यातून होणारी गर्दी परवडणारी नाही. ही बाब लक्षात घेत अनेक शहरांमध्ये पुन्हा दारू विक्रीवर बंदी आणण्यात आली.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दारूसाठी तळमळत असलेल्या तळीरामांचा पुन्हा हिरमोड झाला. मात्र राज्याचा महसूल वाढण्यासाठी दारूची विक्री होणं गरजेचं आहे. पण संसर्ग रोखण्यासाठी तर गर्दी टाळणं गरजेचं आहे. अशी अडचण निर्माण झाली असतानाच पुण्यातील एक्साईज विभागाने मात्र आता नवा तोडगा काढला आहे.
पुण्यात दारूसाठी आता टोकन सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. एक्साईज विभागाने ॲानलाईन नोंदणी सुरू केली आहे. रांगा टाळण्यासाठी एक्साईज विभागाने इ- टोकनची सुविधा केली आहे. त्यामुळे पुण्यातील मद्यप्रेमींना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
पुण्यात काय आहे कोरोनाची स्थिती?
पुणे जिल्ह्यात एकूण 3008 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 161 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 139 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 1 हजार 630 इतकी आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
स्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाचा नवा प्लॅन
पुण्यातील विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तसंच, बाहेरून पुण्यात येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. प्रवास करून येणाऱ्या अशा लोकांमुळे कोरोना संसर्गामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पुणे शहर आणि ग्रामीण भागात इतर ठिकाणाहून येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.