सावधान! गॅस गिझर ठरतोय ‘गॅस बॉम्ब’, मुंबईनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू

सावधान! गॅस गिझर ठरतोय ‘गॅस बॉम्ब’, मुंबईनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू

अंघोळ करताना गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यानं पुण्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

पुणे,06 फेब्रुवारी : पुण्यात आंघोळ करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलंय.  आंघोळ करताना बाथरूमधील गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यानं तरुणाचा जीव गेलाय. पुण्यातील उचभ्रू अशा कोथरूड भागातल्या संगम सोसायटीतल्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. आई-वडील बाहेरगावी गेल्यानं रामराजे सकपाळ हा 30 वर्षाचा तरुण घरात एकटाच होता. घरातून दुर्गंधी येत असल्यानं सोसायटीतील लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तात्काळ धाव घेत अग्नीशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा रामराजे सकपाळ मृत अवस्थेत आढळले. शवविच्छेदनातून समोर आलेलं मृत्यूचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. अंघोळ करताना गॅस गिझरमधून गॅस गळती झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांबरोबर अगदी छोट्या शहरातही वीजेची बचत करण्यासाठी घरात गॅस गिझर लावण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण हाच गॅस गिझर घरातला बॉम्ब ठरतोय. गेल्या काही दिवसात गॅस गिझरमधून होणाऱ्या गॅस गळतीनं अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत.

  • जानेवारी महिन्यात गिझरच्या वायूमुळे मुंबई शहरातील बोरीवली परिसरातल्या एका अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागला होता.
  • लातूरमध्ये गिझरमधील वायु गळती झाली. त्यातून निर्माण झालेल्या कार्बन मोनाक्साईड या विषारी वायुमुळे गॅस गिझर सिंड्रोमनं युवती बेशुद्ध पडली. डॉक्टरांच्या ९ ते १० तासाच्या उपचारानंतर ती युवती शुध्दीवर आली.
  • गॅस गिझरच्या वायू गळतीमुळे भीमाशंकर येथील सख्ख्या भावांचा मृत्यू झाला.

गॅस गिझर कसा बनतो ‘गॅस बॉम्ब’?

इलेक्ट्रिक गिझर महाग असतो म्हणून अनेकजण गॅस गिझरची निवड करतात, पण गॅस गिझरच्या वापराबद्दल महत्त्वाच्या गोष्टींकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. गॅस गिझर ऑन केल्यावर गॅस जळण्यासाठी बाथरूममधल्या ऑक्सिजनचा वापर करतो आणि त्यातून कार्बन मोनोक्साईड वायू संपूर्ण बाथरूममध्ये पसरतो. त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि कार्बन मोनोक्साईडचं वाढतं. परिणामी अपुऱ्या ऑक्सिजनमुळे भोवळ येते. काय होतंय हे त्या व्यक्तीला कळतही नाही. ऑक्सीजनअभावी व्यक्ती जागेवर बेशुद्ध पडते. वेळेवर उपचार मिळाले तर ठीक नाहीतर जागेवर मृत्यूही ओढवतो.

काय घ्यावी काळजी?

गॅस गळती होत आहे का यावर लक्ष ठेवावे, वेळोवेळी तपासणी करावी

गॅस गिझर बिघडल्यास कार्बन मोनोक्साईड हा विषारी वायू तयार होतो

बंदिस्त बाथरूममध्ये गॅस गिझर लावू नये

भरपूर ऑक्सिजन असलेल्या जागेत गॅस गिझर लावावा.

First published: February 6, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या