पुणे, 4 फेब्रुवारी : आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र उमेदवारीवरून जगताप कुटुंबातील मतभेद समोर आले होते. उमेदवारीवरून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे भाऊ शंकर जगताप आमने-सामने आल्याचं चित्र होतं. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून चिंचवडमध्ये जोरदार पोस्टरबाजी देखील करण्यात आली. त्यामुळे भाजपकडून अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळणार की शंकर जगताप यांना याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
अश्विनी जगताप यांना उमेदवारी
अखेर भाजपकडून आज चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अधिकृतरित्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंब उमेदवारीसाठी इच्छूक होते मात्र, कसब्यामधून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही वाचा : कसबा, चिंचवडसाठी 'मविआ'चे उमेदवार ठरले? भाजपचं टेन्शन वाढणार!
अश्विनी जगताप विरूद्ध राहुल कलाटे लढत?
सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीकडून चिंचवड मतदाससंघात राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. थोड्याच वेळात मविआकडून उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळाल्यास चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप विरुद्ध राहुल कलाटे असा सामना पहायला मिळू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP