भाजपची सिंहगडावर स्वारी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 6, 2017 04:09 PM IST

भाजपची सिंहगडावर स्वारी

[wzslider]

अद्वैत मेहता,06 फेब्रुवारी : भल्या पहाटेच भाजपचे महापालिका निवडणुकीतील शिलेदार अर्थात उमेदवार किल्ले सिंहगडावर हजर झाले.शहर अध्यक्ष योगेश गोगावले ,कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासोबत चहापोह्यांचा नाष्टा करत सेल्फी काढत हे उमेदवार गप्पा गोष्टीत रंगले होते.नियोजित वेळेपेक्षा तब्बल दीड तास उशिरा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे,पालकमंत्री गिरीश बापट ,खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे यांचं आगमन झालं.मग पुणे दरवाजावरून गडाकडे कूच केलं. निम्मित होतं सर्व उमेदवारांना छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरून शपथ देण्याचं.

आम्ही सर्व निवडून आल्यावर शिवरायांप्रमाणे पारदर्शी कारभार करू,भ्रष्टाचार करणार नाही अशी प्रतिज्ञा यावेळी सर्व उपस्थित उमेदवारांनी दिली.यावेळी शिरोळे, बापट,काकडे ,दानवे या सर्वांनीच पुण्याचा गडही आपला आणि सिंहही आपला असा आत्मविश्वास व्यक्त केला.अर्थात शिवसेनेचा वाघ सोबत नाही त्यामुळे स्वबळाची भाषा करण्यात आली.दानवे यांना यावेळी तलवारही देण्यात आली.

शिवरायांना स्मरून शपथ घेणं ,प्रतिज्ञा घेणं हा स्वागतार्ह,स्तुत्य उपक्रम असला तरी तिकीट वाटपाच्या निमित्ताने गुंड पुंड वृत्तीच्या लोकांना दिलेला प्रवेश निष्ठावंताना डावलून ऐनवेळी विरोधी पक्षातील आयात उमेदवार, आयाराम यांना दिलेली तिकिटं, खासदार आणि 8 पैकी 5आमदारांच्या घरात झालेलं तिकीट वाटप यामुळे छत्रपतींचा आदर्श  नेमका कसा घेणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

शिवाय पालिकेत नगरसेवक म्हणजे माननियांचा कारभार म्हणजे रस्ते आणि तत्सम विकासकामांची कंत्राटे आपल्याच बगलबच्यांना कशी मिळतील, स्टँडिंग कमिटीमध्ये वर्णी लागून टक्केवारीमधला वाटा कसा मिळेल याकडे लक्ष असल्याने किंबहुना तेच टार्गेट असल्यानं शिवरायांप्रमाणे कारभार करणं झेपेल का हा प्रश्न अलाहिदा.

Loading...

त्यातही शिवकाळात भ्रष्टाचार,गैरवर्तन केलं तर कडेलोटाची शिक्षा दिली जायची. आताचा जमाना क्लीन चीटचा आहे.त्यामुळे शिवप्रेेमाचा हा उमाळा किंवा पुळका हा मतांच्या जोगव्याकरता आहे हे रयतेला अर्थात जनतेला पक्कं माहीत आहे तेव्हा घोडामैदान जवळच आहे.23 फेब्रुवारीला कळेलच, असले फंडे उपयोगी पडतात का अंगलट येतात ते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2017 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...