30 जानेवारी : हिंजवडी आयटी पार्कमधील इन्फोसिस (फेज २) कंपनीमध्ये एका आयटी इंजिनीअर तरुणीचा कम्प्युटरच्या वायरने गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. रसिला राजू ओपी असं या इंजिनीअर तरुणीचं नाव असून, ती मूळची केरळची असल्याचं समजते.
इन्फोसिस कंपनीच्या नवव्या मजल्यावरील मीटिंग रूममध्ये रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने कम्प्युटरच्या वायरनेच गळा आवळून तिचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे.
रविवारची सुटी असूनही रसिला ऑफिसमध्ये काही कामानिमित्त आली होती. रसिलाचं एका प्रोजेक्टसंदर्भात दुसऱ्या राज्यातील सहकाऱ्याशी ऑनलाईन बोलणंही सुरू होतं. मात्र, तिला काम नेमून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. शेवटी रात्री ८ वाजता बॉसनं सुरक्षा विभागाला फोन केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी जाऊन बघितल्यावर त्यांना तिचा मृतदेह आढळला.
दरम्यान, कंपनीत हत्या झाल्यानं सुरक्षा रक्षकानं हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी मूळचा आसामचा असलेल्या भाबेन सैल्किया या 26 वर्षीय सुरक्षा रक्षकाला मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे हिंजवडी परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा