जितेंद्र आव्हाडांना धक्काबुक्की, फर्ग्युसनमधला वाद चिघळला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 23, 2016 11:47 PM IST

जितेंद्र आव्हाडांना धक्काबुक्की, फर्ग्युसनमधला वाद चिघळला

jitendra awahad marahanm

पुणे – 23 मार्च : पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये (एफसी) विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याच्या तक्रारीबाबत प्राचार्यांनी काही तासातच घूमजाव केलं. यावर प्राचार्यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. तसंच त्यांच्या गाडीवर दगडफेकही केली. यावेळी पोलिसांना त्यांच्या संरक्षणासाठी पिस्तूल काढावे लागले. पोलिसांनी भाजयुमोच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकारानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजयुमोचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये काल विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या होत्या. त्याबाबत प्राचार्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, याचा जाब विचारण्यासाठी संभाजी ब्रिगेड, दलित पँथर, भारिप बहुजन महासंघटना, आरपीआय, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कॉलेज परिसरात जमले होते. त्यातच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड तिथे आले. ते कॉलेजात दाखल होताच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी 'आव्हाड गो बॅक' च्या घोषणा देणं सुरू केलं. आमदार आव्हाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शिवाय त्यांच्या गाडीवर लाथाही मारण्यात आल्या. पोलिसांनी लाथा मारणार्‍या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

दोन्ही बाजूची स्थिती जाणून न घेता फर्ग्युसन कॉलेजात घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करणारे आणि पोलिसांना चुकीची माहिती देणारे प्राचार्य रवींद्रसिंग परदेशी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी आव्हाड यांनी यावेळी केली. लोकशाही व्यवस्थेत विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कॉलेजाच घडलेल्या कालच्या प्रकारानंतर कन्हैया कुमारला फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणावेच लागेल. कन्हैयाच खर्‍या अर्थानं आजच्या तरूणाईचा आवाज आहे असेही आव्हाड पुढे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2016 08:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...