25 ऑगस्ट : पुणे वगळता राज्यभरातील पेट्रोलपंप चालक मध्यरात्रीपासून संपावर जाणार होते. पण भाजप नेते विनोद तावडे यांच्या मध्यस्थीमुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. तावडे यांनी आश्वासन दिल्यानंतर फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनने आपला संप स्थगित केला आहे.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विनोद तावडे यांच्या उपस्थितीत असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी संप मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं.11 ऑगस्ट रोजी पेट्रोलचालकांनी 3 दिवसांचा लाक्षणीक संप पुकारला होता.
पण सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा असोसिएशनने दिला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट कमी करू आणि एलबीटीही रद्द करू असं आश्वासन तावडे यांनी असोसिएशनला दिलं. तावडे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे असोसिएशनने ऐन गणेशोत्सव लक्षात संप मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. परंतु दुसरीकडे पेट्रोल पंप मध्यरात्रीपासून बंद होणार आहे यामुळे वाहनचालकांनी पेट्रोलपंपावर एकच गर्दी केली होती. पेट्रोलपंपांवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अखेरीस पंपचालकांनी संप मागे घेतल्यामुळे वाहनचालकांचा जीव भांड्यात पडलाय.
Follow @ibnlokmattv |