राज ठाकरेंची सभा नदीपात्रातच भरणार !

राज ठाकरेंची सभा नदीपात्रातच भरणार !

  • Share this:

raj arrest warant07 फेब्रुवारी : अखेर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील 9 फेब्रुवारीच्या सभेला जागा मिळाली आहे. पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्रात राज यांची सभा भरणार आहे. आयबीएन लोकमतने गुरुवारी सर्व प्रथम "राज यांची सभा मुळा-मुठा नदीपात्रात" होणार असल्याचं वृत्त दिलं होतं. आयबीएन लोकमतची बातमी खरी ठरलीय.

राज यांची सभा नदीपात्रातच होणार असल्याची माहिती मनसेचे पुण्यातील वरिष्ठ नेते दीपक पायगुडे यांनी आयबीएन लोकमतला दिलीय. राज यांच्या या सभेला सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. नदीपात्रातील सभेला पोलिसांनी अगोदरच परवानगी दिली होती. परवानगी राहिली होती ती जलसंपदा खात्याची आता त्यालाही जलसंपदा खात्याने हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे नदीपात्रात राज यांची सभा होणार हे निश्चित झालंय.

'टोल द्यायचा नाही, जर कुणी अडवलं तर त्याला तुटवा' असा आदेश दिला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी..आणि राज यांनी आदेश द्यावा आणि मनसेसैनिकांनी तो अंमलात नाही आणावा असं कधी झालं नाही. राज यांच्या आदेशानंतर काहीतासातच मनसैनिकांनी टोल नाक्यांवर हल्लाबोल केला. दोन दिवस राज्यभरात टोल नाके जमीनदोस्त केले. एकट्या पुण्यात टोल नाक्याची 'टोल'फोड ही 73 लाख इतकी झाली. या प्रकरणी राज यांच्यावर चार ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर 9 फेब्रुवारीला पुण्यात सभा घेणार असं राज यांनी जाहीर केलं.

पण राज यांच्या सभेला जागाच मिळत नसल्यामुळे मनसेची चांगलीच पंचाईत झाली. राज यांच्या सभेसाठी पुण्यात अलका टॉकीज चौकात पोलिसांनी परवानगी नाकारली तर एस. पी कॉलेज ग्राऊंडवर राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाही असा ठराव शिक्षण प्रसारक मंडळाने केलाय. त्यामुळे दोन्ही जागा आपोआप रद्द झाल्यात. पण तरीही मनसेचे पुण्यातील नेते एस.पी. कॉलेजवरच सभा घेऊ असं ठामपणे सांगत होते. शहरात ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या सभेचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले. त्यावर सभेचं ठिकाण म्हणून एस. पी. कॉलेज ग्राऊंडचा उल्लेखही केलाय. पण खरंच एस.पी. कॉलेजच्या ग्राऊंडवर सभा होईल का यावर बोलायला एकही मनसेचा नेता तयार नव्हता. अखेर पुण्यातील संभाजी उद्यानांच्या पाठीमागे असलेल्या मुळामुठा नदीच्या मोकळ्या पात्रात सभा घेण्याचं ठरलं.

या नदी पात्राच्या अर्ध्या भागात मनोरंजन नगरी असल्यामुळे जागेची अडचण आहे. पण आता सभेला जागाच मिळत नसल्यामुळे दुसरा पर्याय मनसेकडे नव्हता. कसबा पेठेतील मनसेसैनिकांनी पोलिसांकडे यासाठी अर्ज केला. याला पोलिसांनी परवानगी दिली. त्यामुळे राज यांची सभा मुळा-मुठा नदीच्या पात्रात होणार यासाठी मनसे तयार झाली. पण मुळा मुठा नदीचं पात्र जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येतं. जलसंपदा खातं हे राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे या जागेसाठी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची परवानगी महत्वाची होती अखेर आज जलसंपदा खात्यानेही राज यांच्या सभेला हिरवा कंदील दिलाय. विशेष म्हणजे आजपर्यंत राज यांच्या अनेक सभा झाल्यात. पण या सभेबद्दल कमालीची उत्सुकता लागून आहे. खुद्द राज यांनीच नऊ चा खाऊ सभेतच मिळेल असे संकेत दिले होते. त्यामुळे आता 9 तारखेच्या सभेत राज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

 

First published: February 7, 2014, 6:34 PM IST

ताज्या बातम्या