राज ठाकरेंची सभा 'मुळा-मुठा'च्या पात्रात ?

राज ठाकरेंची सभा 'मुळा-मुठा'च्या पात्रात ?

  • Share this:

2352 raj on toll06 फेब्रुवारी : पुण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा कुठे घ्यायची यासाठी शोधा-शोध करुन दमलेले मनसेसैनिक अखेर मुळा-मुठा नदीच्या 'किनार्‍या'वर येऊन थांबले आहे. पुण्यातील संभाजी उद्यानांच्या पाठीमागे मुळा-मुठा नदीच्या पात्रात राज यांची सभा होण्याची शक्यता आहे. या नदीपात्रात सभेसाठी पोलिसांना परवानगी दिली आहे. त्यामुळे राज यांची सभा मुळा मुठा नदीच्या पात्रात होण्याची दाट शक्यता आहे. पण मुळा मुठा नदीचं पात्र जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येतं. जलसंपदा खातं हे राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे याला परवानगी देतील का हाच प्रश्न आता उरला आहे.

राज्यभरात 'टोल'फोडीचे सुत्रधार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात रविवारी 9 फेब्रुवारीला जाहीर सभा होणार..होणार म्हणून गेल्याआठवड्याभरापासून मनसे कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केलीय. यासभेबाबत कमालीची उत्सुक्ता लागून आहे. पण ही सभा कुठं होणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे. राज यांच्या सभेसाठी अलका टॉकीज चौकात पोलिसांनी परवानगी नाकारली तर एस. पी कॉलेज ग्राऊंडवर राजकीय पक्षांना सभा घेता येणार नाही असा ठराव शिक्षण प्रसारक मंडळाने केलाय. त्यामुळे दोन्ही जागा आपोआप रद्द झाल्यात. पण तरीही मनसेचे पुण्यातील नेते एस.पी. कॉलेजवरच सभा होणार यावर ठाम आहेत.

शहरात ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या सभेचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज  लावण्यात आले आहे. त्यावर सभेचं ठिकाण म्हणून एस. पी. कॉलेज ग्राऊंडचा उल्लेखही केलाय. पण खरंच एस.पी. कॉलेजच्या ग्राऊंडवर सभा होईल का यावर बोलायला एकही मनसेचा नेता तयार नाही. मुंबईतल्या नेत्यांना काय ते विचारा असा पवित्रा त्यांनी घेतलाय. पण राज यांची सभा तर झालीच पाहिजे. यासाठी पुण्यातील मैदान, मोकळी जागा शोधून काढणारे मनसेसैनिकांनी अखेर संभाजी उद्यानांच्या पाठीमागे असलेल्या मुळामुठा नदीच्या मोकळ्या पात्रात येऊन पोहचले आहे.

या नदी पात्रात सभा घ्यावी का अशी चाचपणी पण अगोदर करुन पाहिली. कारण, या नदी पात्राच्या अर्ध्या भागात मनोरंजन नगरी आहे. सभा जरी घेतली तर 40 ते 50 हजार लोकंच इथं जमू शकतील. एक तर राज यांच्या सभेसाठी लाखोंची गर्दी असते त्यामुळे हा पर्याय रद्द करण्यात आला होता.पण आता सभेला जागाच मिळत नसल्यामुळे कसबा पेठेतील मनसेसैनिकांनी पोलिसांकडे अर्ज केला. याला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राज यांची सभा मुळा-मुठा नदीच्या पात्रात होण्याची दाट शक्यता आहे. पण मुळा मुठा नदीचं पात्र जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येतं. जलसंपदा खातं हे राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे या जागेसाठी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची परवानगी महत्वाची ठरणार आहे. जर जलसंपदा खात्याने परवानगी दिली तर राज यांच्या सभेचा मार्ग मोकळा आहे.

First published: February 6, 2014, 10:58 PM IST

ताज्या बातम्या