13 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हिरवा कंदील दाखवलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यामध्ये नवी मुंबई आणि पुणे एअरपोर्टला हिरवा कंदील मिळालाय. तर नागपूर एअरपोर्टचं आधुनिकीकरण होणार आहे.अनेक महत्वाच्या प्रकल्पांना या भेटीत मंजुरी मिळाली आहे.
पंतप्रधानांसोबतच्या पायाभूत सुविधांबद्दलच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं 4 अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा केली. नवी मुंबई एअरपोर्ट, पुण्यातीलं नवं प्रस्तावित एअरपोर्ट, नागपूर एअरपोर्टचं विस्तारीकरण आणि मुंबईतल्या चर्चेगेट ते विरार या एलिव्हेटेड कॉरीडोअरची जुनी मागणी याबद्दल ही चर्चा झाली.
मुंबई आणि पुणे या दोन्ही विमानतळांची क्षमता येत्या 4 वर्षांमध्ये संपण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही शहरांना नव्या विमानतळांची गरज आहे. म्हणूनच नवी मुंबई विमानतळाच्या जमीन संपादनासंबंधीची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली आणि जमिनीच्या मोबदला बद्दलचा फॉर्म्युला केंद्र सरकारकडून मंजूर करून घेण्यात आला. हे विमानतळ 2017 पर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. पुण्याच्या विमानतळाबद्दल सुद्धा गेली अनेक वर्षं चर्चा होती. या विमानतळाची जागा आज निश्चित करण्यात आली.
त्याचवेळेला नागपूर विमानतळाला आणखी एक धावपट्टी देण्याचा मुद्दा प्रलंबित होता. संरक्षण मंत्रालयाची जमीन यासाठी लागणार होती. आज संरक्षण मंत्रालयाकडून ही जमीन लवकरात लवकर मिळवून देण्याचं आश्वासन महाराष्ट्राला मिळालंय. मुंबईतील चर्चगेट ते विरार हा ऍलिव्हेटेड कॉरीडोअर आता बांद्रा ते विरार असा होण्याची शक्यता आहे. याबद्दल केंद्रीय नियोजन आयोग, रेल्वे आणि एमएमआरडीए ट्रॅफिक स्टडी करणार आहेत त्या अभ्यासावर बांद्रा ते विरार करायचा की मुळचाच ठेवायचा याबद्दल विचार केला जाईल.