दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक कधी?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2013 10:15 PM IST

narendra dabholkar 319 सप्टेंबर : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 1 महिना पूर्ण होत आलाय. पण आरोपी अजूनही मोकाटच आहेत. पोलिसांच्या 19 टीम्स राज्यभरात तपास करत आहे. पण मारेकर्‍यांना पकडण्यात अजून तरी यश आलेलं नाहीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या आश्वासनानंतरही तपासात अजून कोणतीच प्रगती झालेली नाहीय. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होतोय.

 

मागिल महिन्यात 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यात दाभोलकर यांची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शीच्या माहितीवरुन दोन संशयितांचे रेखाचित्र जारी करण्यात आले होते. या रेखाचित्राच्या आधारे तपास सुरु आहे. पण अजूनही पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. तसंच ज्या ठिकाणी दाभोलकरांचा खून झाला होता तेथील सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेण्यात आले. पण फूटेज अस्पष्ट असल्यामुळे ते लंडन येथील लायब्ररीत पाठवण्यात आले. पण यातूनही हाती काहीच आले नाही. विशेष म्हणजे दाभोलकरांच्या खुनानंतर हा खून गांधी विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून झाला असून हा एक कट आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर तपास अंधारातच आहे.

 

तपास कुठपर्यंत आला?

Loading...

 

  • - राज्यभरात पोलिसांच्या 19 टीम्स करतायत तपास
  • - महिनाभरात 200 गाड्या तपासल्या
  • - 2000 गुन्हेगारांची चौकशी
  • - 6 प्रत्यक्षदर्शी समोर आले
  • - गुन्ह्याची व्याप्ती बघता सर्व शक्यतांचा तपास सुरू
  • - आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नाही
  • - सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग झाला नाही
  • - रेखाचित्रांच्या आधारेच तपास सुरू

दरम्यान, दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात यावे यासाठी राज्यभरात आंदोलनं झाली. दाभोलकर यांचा मुलगा डॉ.हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी ठिकठिकाणी सभा,परिषद घेऊन दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक व्हावी अशी मागणी केली. तसंच राज्यापासून ते दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्यात. आज मुक्ता दाभोलकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर संशय घेतला.

 

सगळ्या प्रकारचे मारेकारी सापडतात परंतू डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही सापडत नाही. तपास सुरु असला तरी मारेकरी अजूनही हातात नाही. संशय म्हणून पाहिला तर हा खून सरकार स्पॉन्सर्ड तर नाही ना असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केला. राज यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे पक्षाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी हा राज यांची प्रसिद्धीसाठी स्टंट आहे असा टोला लगावला.

 

तर शिवसेना सत्तेत असताना केणींची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला राज यांनी स्पॉन्सर्ड आहे असं का म्हटलं नाही अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक केली. तर खुद्द गृहमंत्र्यांनी राज यांना उत्तर देण्याच टाळलं. राजकीय द्वेषातून कुणीही आरोप करत असतील तर त्याला उत्तर देण्याची आवश्यक्ता नाही अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं. एकंदरीच या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोप होत असले तरी मारेकर्‍यांना अटक व्हावी एवढीच अपेक्षा अंनिसचे कार्यकर्ते करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2013 10:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...