पुणे, 03 डिसेंबर : कोरोना काळात राज्य सरकारकडून महापालिकेला कोरोना तपासणीसाठी मिळालेल्या ‘रॅपिड अँटीजन कीट’ प्रकरणात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हा प्रकार निष्पन्न झाला असून, तसे पत्रही वारजे पोलिसांनी महापालिकेला दिले आहे.
वारजे येथील महापालिकेच्या डॉ. अरविंद बारटक्के दवाखान्यातील स्वॅब सेंटरवर आलेल्या 18 हजार 500 तपासणी किटपैकी 60 ते 80 टक्के कीट रुग्णांसाठी न वापरता त्यांची परस्पर विक्री करून त्याजागी तब्बल 11 हजारांहून अधिक बोगस रुग्णांच्या नोंदी केल्याचा आणि त्यांना एसएमएस जाऊ नये म्हणून रुग्णांऐवजी सेंटरवरील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे नंबर नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
(पुणेकरांनो सावधान! शहरात नव्या घातक विषाणूची एन्ट्री, 4 वर्षीय बालकाला लागण)
या घोटाळ्यातून ३४ लाख रुपये या केंद्रावरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी लाटल्याचे वारजे माळवाडी पोलिसांच्या प्राथमिक तपासातही निष्पन्न झाले असून, तसे पत्रही पोलिसांनी महापालिकेला दिले आहे. तर, तक्रारदाराच्या मते ही रक्कम 80 ते 90 लाख रुपये आहे. पुण्याच्या महापालिकेच्या आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
या भ्रष्टाचाराला बारटक्के दवाखान्यातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळसुरे यांनी आरोग्य यंत्रणेकडे आणि पोलिसांसह ३२ ठिकाणी तक्रार करत या प्रकरणाला वाचा फोडली आहे. हा प्रकार जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आणि वारजे पोलिसांच्या तपासानुसार या घोटाळ्याचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.