पुणे, 6 सप्टेंबर : स्थानिक प्रशासनाने देशात कुठेही पुन्हा लॉकडाऊन करू नये, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. मात्र पुण्यात महापालिकेने घेतलेल्या एका निर्णयाने खळबळ उडाली. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कंटेन्मेंट आदेश काढण्यात आला. या आदेशान्वये सिंहगड रोड परिसरात पत्रेही मारण्यात आले. तसंच अत्यावश्यक सेवा वगळून परिसरातले सगळे व्यवहार बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं.
महापालिकेतील वॉर्ड अधिकाऱ्याने सिंहगड रोड परिसरात लॉकडाऊनचा आदेश दिल्याने खळबळ उडाली. मात्र त्यानंतर थेट महापौरांनी या प्रकरणात उडी घेत मध्यस्थी करण्याची आयुक्तांना सूचना दिली. तसंच हा लॉकडाऊनचा निर्णय रद्द करण्यास सांगितलं. 'शहरातील कुठल्याही भागात लॉकडाऊन होणार नाही. याबाबत एका ठिकाणी निर्णय घेण्यात आला होता. तो रद्द करण्याबाबत सूचना दिली आहे,' अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
पुण्यात वेगाने वाढत आहे कोरोना संसर्ग
पुण्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. प्रभावी उपाययोजनांचा अभाव ,सामाजिक अंतर राखणं, मास्क वापरण्याच्या नियमांचं पालन न केल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
- पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा एक लाखांच्या पार पोहोचला
- पुण्यातला लॉकडाऊन लवकर उठवल्याची पालकमंत्री अजित पवारांची कबुली
- पुण्यातला रुग्णवाढीचा दर आयसीएमआर दिलेल्या मानकापेक्षा जास्त
- सामाजिक आंतर, मास्क, सॅनिटायजर यांचा वापर रोजच्या जगण्यातला अविभाज्य भाग बनवणे गरजेचं
- पुण्यातला कोरोनाग्रस्तांचा मृत्युदर चिंतेचा विषय, मृत्यूदर कमी करण्याचा प्रशासनासमोर आव्हान
- गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर कार्डियाक ॲम्बुलन्स यासारख्या सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनासमोरचे मुख्य आव्हान
- औषधांचा तुटवडा रोखण्यासाठी साठवणूक करणाऱ्या औषध व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज