एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, 'क्लीन चिट'ला अंजली दमानियांचं आव्हान

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, 'क्लीन चिट'ला अंजली दमानियांचं आव्हान

पक्षानं विचार केला नाही तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसे यांनी दिला..

  • Share this:

पुणे,13 डिसेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना दिलेल्या क्लीन चिटला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्याविरोधातील अंजली दमानिया यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे यांनी दाखल केलेला त्रयस्थ अर्जदाराचा हस्तक्षेप अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे.

गेल्या वर्षी मे 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात दिलासा दिला होता. एकनाथ खडसेंवर आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला होता. एसीबीने या प्रकरणाचा अंतिम अहवाल कोर्टात सादर केला होता. जमीन खरेदी प्रकरणात खडसेंमुळे सरकारचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, असा उल्लेख अहवालात करण्यात आला होता.

मात्र, अंजली दमानिया यांनी दीड वर्षांपूर्वी पुणे सेशन कोर्टात अर्ज केला होता. दमानिया यांनी सु्प्रीम कोर्टातील निकालाचा दाखला देत त्याला आव्हान दिले होते. खडसे यांनी पदाचा गैरवापर करत जमीन पत्नी आणि जावयाच्या नावे विकत घेतल्याचा आरोप आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार एका दिवसांत झाला असून, याबाबतचे पुरावे दिल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे हे हिवाळी अधिवेशनावेळी नागपूरात असल्याची माहिती कळते आहे. हिवाळी अधिवेशनावेळी यापूर्वी अनेकदा राजकीय उलथापालथी झाल्याचा इतिहास आहे. खडसे यांनी पक्षानं विचार केला नाही तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला होता. तसे काही करण्याची हीच ती वेळ खडसे साधतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

बाळासाहेब थोरात यांनी खडसे यांचे काँग्रेसमध्ये स्वागताची भूमिका घेतली होती. खडसे दिल्लीला गेल्यानंतर त्यांना भाजपच्या कोणत्याही नेत्यांने भेट दिली नव्हती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र खडसेंना दिल्लीतील निवासस्थानी बोलावून जवळपास पाऊण तास चर्चा केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खडसे यांची विधानभवनात भेट घेत चर्चा केली होती. खडसे यांनी कालच्या गोपीनाथगडाच्या भाषणात थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडलेत. कालच्या सभेनंतर खडसे मुंबईत परतले असून आजही त्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 02:33 PM IST

ताज्या बातम्या