पुणे, 1 डिसेंबर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 69.08 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. सर्वाधिक मतदान पुणे शिक्षक मतदारसंघात नोंदलं गेलं त्यातही कोल्हापूर जिल्ह्यातील टक्केवारी ही तब्बल 86 टक्क्यांच्या आसपास होती.
ही वाढीव टक्केवारी नेमकी कोणाला फायदेशीर ठरते हे निकालानंतरच स्पष्ट होईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच प्रत्यक्ष निवडणूक होती. त्यात महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस विरूद्ध भाजप असा थेट सामना पाहायला मिळाला आहे. भाजप 5, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 2 तर शिवसेनेनं एका जागेवर ही निवडणूक लढवली आहे.
मतदारसंघ निहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले.
महाविकास आघाडीची लिटमस्ट टेस्ट
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात ऐतिहासिक आघाडीचा जन्म झाला. शिवसेनेनं भाजपपासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने नुकतीच वर्षपूर्ती केली. हे तीनही पक्ष एकत्र सत्तेत तर आहेत, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांचं खरोखरच मनोमिलन झालं आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून केला जातो. राज्यातील विधानपरिषद निवडणूक निकालानंतरच कदाचित या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.