पुणे, 25 एप्रिल : कोरोनाच्या या संकटानं मानवाची दोन रुपं दाखवली किंवा समोर आणलं असं म्हणायला हरकत नाही. एकिकडं या भयंकर रोगाच्या भीतीनं काही आपल्या लोकांनीच अगदी सख्ख्यांनाही दूर लोटलं. तर काहींनी काहीही संबंध नसताना कोरोनाशी लढा देणाऱ्यांना आणि गरजुंना अगदी आपलं असल्यासारखं भरभरून दिलं. अशीच एक व्यक्ती म्हणजे पुण्याची आकांक्षा साडेकर. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत होरपळणाऱ्या किंवा झगडणाऱ्या शेकडो लोकांचं पोट आकांक्षामुळं भरतंय तेही अगदी मोफत.
(वाचा-'कोरोना संकटकाळात मोदींच्या एका हाकेला धावून आले सगळे भारतीय उद्योजक' - CAIT)
आकांक्षा साडेकरचा हा प्रवास खरं तर सुरू झाला तो एका डब्ब्यापासून. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आकांक्षाच्या भावाच्या एका मित्राला काही दिवसांपूर्वी जेवणाची अडचण आली. त्यावेळी आकांक्षानं त्याला डबा दिला. त्यानंतर असे कितीतरी लोक असतील जे अन्नावाचून उपाशी राहत असतील याची जाणीव आकांक्षाला झाली. मग काय आजच्या युगातलं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे सोशल मीडियाचा तिनं वापर केला. तुम्ही पुण्यात असाल आणि आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, कोरोना योद्धे म्हणून काम करत असाल किंवा तुम्हाला गरज असेल तर घरचा डब्बा मिळेल, असं आकांक्षानं सांगितलं. मग काय हळू हळू रोज 10, 15, 22, 40 डब्यांचा हा प्रवास आता रोज 350 डब्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. आकांक्षानं 7 एप्रिलला हा उपक्रम सुरू केला होता. तेव्हापासून रविवारपर्यंत म्हणजे 25 एप्रिलपर्यंत तिनं 3500 डबे गरजुंना पुरवले आहेत. विशेष म्हणजे हे सर्वच डबे आकांक्षा पूर्णपणे फ्री देते. त्यासाठी काहीही पैसे आकांक्षा आकारत नाही.
Today I dropped off my 3500th Dabba in #Pune Area since I started the small initiative of dropping home food on the 7th of April. We are solely running on donations and we don't do a whole fanfare of it. If you wish to donate in cash or kind (groceries, vegetables) DM
— Aakanksha Sadekar (@scottishladki) April 25, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध लागले त्यावेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पुण्यात नाईट कर्फ्यू सुरू झाला. त्यावेळी रात्रीच्या वेळी बाहेर खायलाही काहीही मिळत नव्हतं. त्यावेळी रात्री आकांक्षानं एका तरुण डॉक्टरचं ट्विट पाहिलं. खायला काही मिळालं नाही म्हणून इन्सटंट नूडल तो खात होता. त्यावेळी आपल्यासारख्या लोकांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्यालाच खायला मिळत नाही, याचं आकांक्षाला वाईट वाटलं. त्यावर तिनं ट्विट केलं आणि अशा लोकांना घरचं जेवण पुरवायला आवडेल असं तिनं त्यात सांगितलं आणि तिचा हा प्रवास सुरू झाला. विद्यार्थी, डॉक्टर, पोलीस, अॅम्ब्युन्स ड्रायव्हर अशा अनेकांकडून तिला डब्यांची मागणी येऊ लागली. सध्या रोज 350 जणांना ती डबे पुरवते.
(वाचा-105 वर्षांची आजी म्हणते, 'कोरोना माझं काही वाकडं करू शकत नाही'; 9 दिवसांत मात)
या कामात आकांक्षाला अनेक जण स्वतःहून मदत करत असल्याचं तिनं सांगितलंय. यासाठी लागणारा खर्चही वाढत असल्यानं आकांक्षा देणगी स्वीकारत असून त्याचा काटेकोर हिशेब ठेवत असल्याचंही ती सांगते. डबे तयार करण्याच्या कामातही तिला तिचे मित्र मदत करत आहेत. आता याला कम्युनिटी किचनचे स्वरुप देण्याचा विचार आकांक्षा करत आहे. गरजुंना जेवण पुरवून त्यांचं पोट भरायचं काम तिला करायचं आहे. अडकलेले मजूर, गोर गरीब यांनीही उपाशी राहू नये यासाठी ती प्रयत्न करते आहे. या कामानं मिळणारं समाधान मोठं असल्याचं आकांक्षा सांगते. पण प्रत्येकानं इतरांबद्दल विचार केला तर अशा असंख्य आकांक्षा समोर येऊ शकतात ते करणं गरजेचं असल्याचं तिचं म्हणणं आहे.
डॉक्टरला मॅगी खाताना पाहून वाटलं वाईट, त्यानंतर तरुणीनं असं काही केलं की आज भागवतेय शेकडोंची भूक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Pune