पुणे, 01 जानेवारी : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे एकाच व्यासपीठावर आले आहे. यावेळी, 'अजितदादा तुम्ही मला एकतर चहाला बोलवा किंवा तुम्हीच आमच्याकडे या' अशी ऑफरच देवेंद्र फडणवीस यांनी भर व्यासपीठावरून दिली.
पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली.
'पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होता. दोन दिवसांपासून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार म्हणून बातम्याच बातम्या ऐकायला मिळाल्या. आता मी आणि दादा एकत्र येणार असलो की दोन दिवस बातम्या चालतात आता आम्ही काय कुस्ती करणार की गाणे म्हणणार होतो. त्यामुळे अजितदादांनी एकतर माझ्याकडे चहाला यावे किंवा मला तुमच्याकडे बोलवावे, मीडियाला बातम्याच बातम्या मिळतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
'पुणे महापालिकेच्या भामा आस खेड प्रकल्पाची पुणेकरांना नव वर्षाच्या दिवशी ही भेट मिळाली आहे. या प्रकल्पाच्या प्रश्नासाठी गिरीश बापट यांनी वेळोवेळी बैठका घेतला होत्या. पालिकेकडूनही चांगली योजना निर्माण झाली आहे. यापुढे पुण्याच्या प्रश्नासाठी काही अडचण जरी आली तरी तिजोरीच्या चाव्या यात अजित पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे कुठे कमी पडणार नाही', असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, महापालिकेच्या सभागृहात अजित पवार जात असताना भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी पुणे शहराची 'ताकद गिरीश बापट' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'दादा दादा' घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
एकच नारा जय श्रीराम श्रीराम अशा घोषणाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्याला उत्तर म्हणून एकच वादा अजित दादा दादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.