पुणे, 4 जुलै, चंद्रकांत फुंदे : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आता अजित पवार यांच्यामुळे पुण्यात भाजपाची गोची होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे अजित पवार आता पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकणार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आमदार भरणे यांनी देखील अजित पवार यांना पाठिंबा दिल्यानं इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली. त्यानतंर त्यांनी लगेच आपल्या आठ नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. आता मंत्रिपद मिळताच अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या पुण्याचं पालकमंत्रिपद भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. मात्र अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. अशा परिस्थितीमध्ये भाजप काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडल्याचं चित्र आहे. आज दोन्ही गटाची पुण्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे कोण कुठे जाणार याचं चित्र आज स्पष्ट होण्याची शक्यात आहे.

)







