पुणे, 7 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उलथापालथी घडत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झालाय. या भूकंपाचे केंद्रबिंदू आहेत शरद पवार यांचे पुतणे अजित पवार . विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सांभाळणारे अजितदादा आता राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.अजितदादांसोबत त्यांच्या 8 प्रमुख सहकाऱ्यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलीय. इतकंच नाही तर आपल्याला बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे, असा अजितदादांचा दावा आहे. मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी त्याची झलक दाखवलीय. अजितदादांची उपमुख्यमंत्री म्हणून ही पाचवी टर्म आहे. गेल्या 3 दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या अजित पवार यांनी पहिली निवडणूक कधी लढवली हे तुम्हाला माहिती आहे का? राज्य विधानसभेतील ज्येष्ठ आमदार असलेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदा विधानसभेची नाही तर लोकसभेची निवडणूक लढवली होती.अजित पवार लोकसभेत पहिल्यांदा का गेले? त्यांनी पहिली निवडणूक कुणाविरुद्ध लढवली? त्या निवडणुकीत कसं वातावरण होतं? याची आठवण पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी सांगितलीय.
अजित पवार हे 1991 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी भाजपा उमेदवार प्रतिभा लोखंडे यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. अजित पवार यांना पहिल्या निवडणुकीत 4 लाख 37 हजार 293 तर प्रतिभा लोखंडे यांना 1 लाख 1 हजार 30 मतं मिळाली होती. अजित पवार यांची लोकसभेतील कारकिर्द अल्पजीवी ठरली. पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार यांना संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. बारामाती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडून गेले. तर अजित पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यामध्ये विजय मिळवला, अशी माहिती खोरे यांनी दिली. स्वत:चा फोटो न वापरण्याची सूचना करण्याचा शरद पवारांना अधिकार आहे? पाहा कायदा काय सांगतो, Video ‘अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत.तसेच काका शरद पवार यांच्या कडून अजित पवारांनी राजकारणाचे धडे गिरवले असल्याने आजचा यशाचा टप्पा त्यांना गाठता आलाय,’ असं खोरे यांनी स्पष्ट केलं. पहिल्यांदाच तगडं आव्हान? गेली 3 दशकं विधानसभेचे आमदार असलेले अजित पवार यांनी आता आपले काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरुद्ध बंड पुकारलंय.. आजवर बारामतीची निवडणूक विक्रमी मताधिक्यानं जिंकणाऱ्या अजित पवार यांना आगामी निवडणुकीत तगडं आव्हान असणार आहे.

)







