बारामती, 22 मे : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या कडक स्वभावामुळे सर्वपरिचित आहेत. जवळचा कोणीही पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ता असो किंवा प्रशासनातील कोणताही अधिकारी असो जर तो चुकीचे काम करत असेल तर अजित पवार जाहीरपणे कान उघडणी करताना पाहायला मिळतात. असाच एक प्रकार काल (रविवारी) बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी गावात सभेदरम्यान घडला. अजित पवार बोलत असताना पाहुणेवाडी गावातील नागरिकांनी पाहुणेवाडी गावात अवैधरित्या दारूविक्री सुरू असल्याची तक्रार केली. लगेच अजित पवारांनी पोलिसांना धारेवर धरत पोलिसांची कान उघडणी केली. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आता पोलिसांची कामे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी करतो. पोलीस प्रशासन निवांतपणे आपला पगार घेईल, पाहुणेवाडी गावातील अवैध हातभट्ट्या चालवतील. आता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि मी शोधत बसतो, असा टोला अजित पवार यांनी लगावला. पोलीस प्रशासनाला मी वारंवार सांगितलं आहे की मी कोणत्याही कामात हस्तक्षेप करत नाही. मात्र, पोलिसांच्या या अशा कर्तुत्वाला मी सॅल्यूटच करतो, असा उपहासात्मक टीका अजित पवारांनी पोलीस प्रशासनावर केली. माझी जरी भट्टी असेल तरी मला पकडा आणि टायरमध्ये घाला असे म्हणताच सभेमध्ये एकच हशा पिकला. यामुळे आता बारामती मधील पोलीस प्रशासन बारामती तालुक्यातील हातभट्टी व्यवसायिक धारकांवर कारवाई करणार का? हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे.
पुण्यात वज्रमूठ
महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सध्या पाहायला मिळत आहे. त्यासाठी पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटातून कामाला सुरुवात झाली आहे. त्यांनी एकत्रित पत्रकार परिषद आयोजित केली आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला होता. पवारांच्या या निर्णयाचा परिणाम आता मविआच्या वज्रमूठ सभेवर होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला आणि उन्हाचं कारण देत सभा पुढे ढकलल्याचं मविआकडून जाहीर करण्यात आलं होतं. आता त्याच सभेसाठी तिन्हीपक्षाकडून तयारीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Baramati