अजित पवार पुन्हा फॉर्मात... एका दिवसात तब्बल तीन मेळावे, आमदारांना दिला 'दम'

अजित पवार पुन्हा फॉर्मात... एका दिवसात तब्बल तीन मेळावे, आमदारांना दिला 'दम'

अजित पवार कसे पुन्हा फॉर्मात आलेत ते... का नाही येणार... सत्तेचं टॉनिकच आहेच तसं...

  • Share this:

चंद्रकांत फुंदे,(प्रतिनिधी)

पुणे,15 डिसेंबर: मध्यंतरीच्या सत्तानाट्यात अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशी 80 तासांचा घरोबा केल्याने पक्षपातळीवर बदनाम झालेले अजित पवार पुन्हा फॉर्मामध्ये आले आहेत. शनिवारी त्यांनी पुण्यात चक्क तीन मेळावे घेऊन नव्या इंनिगची धडाकेबाज सुरूवातही केली आहे. चला तर मग.. पाहुयात अजित पवार बँक इन अँक्शनवरचा हा स्पेशल रिपोर्ट...

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कसे पुन्हा फॉर्मात आलेत ते... का नाही येणार... सत्तेचं टॉनिकच आहेच तसं...शनिवारी तर त्यांनी पुण्यात कमालच केली... एका दिवसांत पिंपरीत एक आणि पुण्यात दोन असे तब्बल तीन कार्यकर्ता मेळावे घेऊन पक्ष कार्यकर्त्यांना यापुढेही मीच तुमचा 'बॉस' राहणार असल्याचे ठणकावून सांगितले. एवढंच नाहीतर मध्यंतरी माझ्याबाबतीत जे काही घडलं ते विसरून जा. स्वत: पवारसाहेबांनीच हा निकाल घेतल्यानेच मी तुमच्यासमोर पुन्हा उभा राहिलो असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.

पक्षातील आपल्या 'बॉसगिरी'बाबत कार्यकर्तांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी पुण्याचा पालकमंत्रीच मीच होणार असल्याचे देखील त्यांनी परस्परच जाहीर करून टाकलं. पक्ष कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित आमदारांना नेहमीच्या दादा स्टाईलने दम भरून झाल्यानंतर अजितदादांनी पुण्यातील रखडलेल्या विकासकामांचाही आढावाही लगेहात उरकून टाकला. गंमत म्हणजे अजितदादांना अजून मंत्रिपदही मिळालेले नाही. तोच अजितदादांची गाडी अशी सुसाट निघाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादा अधिवेशनानंरच्या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यंंत्रीपदाची शपथ घेणार आहेस म्हणे. त्यांच्यासाठी दोन नंबरचं गृहखातं मोठ्या साहेबांनी सेनेकडे राखून ठेवलंय म्हणे. थोडक्यात कायतर प्रदेश राष्ट्रवादीत 'ब्रेक के बाद' का होईना पण पुन्हा 'अजितपर्व' सुरू होणार हे नक्की... अर्थात तसं झालं नाहीतर हे आघाडीचं तीन पक्षांचं सरकार देखील व्यवस्थितपणे चालू शकणार नाही म्हणा... कारण अजितदादांच्या गटाला पुन्हा फोडण्यासाठी नागपूरचे फडणवीस तयारच आहेत... असो... पण यानिमित्ताने पवार काकांनी 'आपला तो बाबू...' ही म्हण पुन्हा खरी करून हेही तितकंच खरं... कारण पुतण्याच्या जागी दुसऱ्या कोणी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला असता तर मुरब्बी पवारांनी त्याचे काय हाल केले असते याची कल्पना देखील कार्यकर्ते करू शकत नाहीत.

अजितदादांनी NCP च्या आमदारांना दिला दम, म्हणाले...

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांचा अजित पवारांच्या हस्ते शनिवारी सत्कार करण्यात आला. आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरचा राष्ट्रवादीचा हा पहिलाच कार्यकर्ता मेळावा होता. त्यात अजित पवार येणार असल्याने सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते अजित पवारांच्या भाषणाकडे त्यामुळे दादा काय बोलतात याची कार्यकर्ते वाट बघत होते. अजित पवारांनी फडणवीसांसोबत जात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीत वेगळं मत तयार झालं होतं. अजित पवार हे अतिशय स्पष्टवक्ते आणि थेट बोलतात त्यामुळे कार्यकर्त्यांना त्यांचं भाषण आवडतं. सोमवारपासून नागपूरात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आमदारांना दम देत शिस्तिचे धडे दिले.

अजित पवार म्हणाले, सगळ्या आमदारांनी अधिवेशनात पूर्ण हजर राहावे, विशेषकरून दत्ता भरणेंनी यांची नोंद घ्यावी असंही त्यांनी सुनावलं. पहिल्या दिवसापासून सर्व आमदारांनी अधिवेशनाला उपस्थित रहायचं, पहिले दोन दिवस काही नसतं, नंतर काही नसतं, असं करून चालणार नाही. लग्न वगैरे दुसऱ्या कोणाला सांगा. सभागृहात उपस्थिती दिसली पाहिजे असं त्यांनी नव्या आणि जुन्या आमदारांना सुनावलं.

ते पुढे म्हणाले, महामंडळाचं पण वाटप होणार आहे, जे काम करणारे आहेत त्यांची नावे द्या, जिथं शक्य आहे तिथं त्या सगळ्यांना सामावून घेण्यात येईल. अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी भर सभेत अजित पवारांना तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी गळ घातली. कार्यकर्त्यांच्या या मागणीला दादांनी संयमाने उत्तर दिलं आणि तुमच्या भावना कळाल्या असं सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमान बोलताना अजित पवार म्हणाले, डिसेंबर संपायच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. राष्ट्रवादीला सरकारमध्ये 15 मंत्रिपदं धरून 17 पदं मिळालीत. यावेळी नवीन खाती घेण्याचा प्रयत्न आहे. विकासकामे मार्गी लावण्यासाठीच अर्थ खातं राष्ट्रवादीकडे ठेवलं.

शहरांसाठी महत्वाचे गृहनिर्माण आपल्याकडे घेतलं आहे. सहकार आपल्यासाठी महत्वाचं म्हणूनच राष्ट्रवादीकडे घेतलं आहे. थेट सरपंच निवड विकासाला अडचणीची त्यामुळे त्यात बदल होऊ शकतो अर्थात आघाडीला विश्वासात घेऊनच करणार आहोत.

राष्ट्रवादी अजून एखादं खातं मिळू शकते, थोडं थांबा असं त्यांनी गृह खात्यासंदर्भात सूचक विधान केलं. त्याच वेळी कार्यकर्त्यांनी दादा, तुम्ही डीसीएम झाले पाहिजे... अशी भरसभेत मागणी केली. त्यावर अजित पवारांनी सगळ्यांना, थांबा जरा थोडं थांबा असं सांगत शांत राहण्याचा सल्ला दिला. अजित पवार पुढे म्हणाले, आयारामांना लगेच रेड कार्पेट नकोच. उगवत्या सूर्यांना नमस्कार करणारे भरपूर जण पक्षात येण्याचा प्रयत्न करतील. पण सगळ्यांनाच तपासूनच घेणार आहोत.काही लोकं तिकडे गेल्यानं पक्षाचं ओझं कमी झालं. साहेबांच्या सातारच्या सभेनं हवा झाली, ईडीने वातावरण बदललं. फडणवीसांना मी पणाचा फटका बसला. तिन्ही पक्षांनी वाद टाळले तर पाच वर्षे सरकार चालेल असंही त्यांनी सांगितलं.

First published: December 15, 2019, 4:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading