जामखेड, 01 जून: चौंडी याठिकाणी सीना नदीपात्राच्या खोलीकरणाचं काम सुरू असताना 250 वर्षे जुना घाट आढळला आहे. हा घाट अहिल्यादेवी यांनी सीना नदीकाठी बांधला होता. पण काळाच्या ओघात हा घाट पाण्याखाली जाऊन मातीत बुजला होता. पण मागील आठवड्यापासून आमदार रोहीत पवार यांच्या पुढाकाराने सीना नदीपात्राच्या खोलीकरणाचं काम सुरू केलं आहे. हे काम सुरू असताना 250 वर्षे जुना घाट कामगारांना आढळला आहे. यानंतर या घाटाच्या पायऱ्यांची स्वच्छता करून रोहित पवार यांनी पूजा केली आहे.
मागील काही दिवसांपासून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील 21 गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये चौंडी या अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळाचाही समावेश आहे. चौंडी येथील सीना नदीपात्राच्या खोलीकरणाच्या कामाला यांच्या आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली होती. या नदीपात्राच्या खोलीकरणादरम्यान मातीखाली बुजलेल्या काही पायऱ्या आढळून आल्या.
यावेळी कामगारांनी जसे जसे खोदकाम केले, तसे तसे नदीपात्राच्या मातीत बुजलेला ऐतिहासिक घाट उघड झाला आहे. हा घाट स्वतः अहिल्यादेवी यांच्या पुढाकारातून बांधला होता. हा घाट अडीचशे वर्षे जुना असून यासाठी वापरण्यात आलेला दगड आणि येथील अहिल्यादेवीच्या मंदिरासाठी वापरण्यात आलेला दगड एकच आहे. हा दगड 250 वर्षांपूर्वी काशीहून आणला असल्याचं सांगितलं जात आहे. काळाच्या ओघात सीना नदीपात्र उथळ होतं गेल्याने हा संपूर्ण मातीखाली बुजला होता. पण आता या घाटीची स्वच्छता केली असून आमदार रोहित पवार यांनी पुजाही केली आहे.
हे ही वाचा- रोहित पवार भडकले, ‘भाजपला कोरोनाशी नाही फक्त राजकारणाशी देणं घेणं’
अलीकडेच आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त चौंडी (ता. जामखेड) याठिकाणी त्यांच्या जन्मस्थळाला भेट दिली होती. येथील अहिल्यादेवींचा वाडा, अहिल्येश्वर मंदिर, चौंडेश्वरी मंदिर, नक्षत्र उद्यान, महादेव मंदिर परिसरातील सीना नदीपात्राच्या दिशेने बांधलेल्या घाटालाही त्यांनी भेट दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit pawar