पुणे, 21 नोव्हेंबर : मोठ्या मेहनतीनंतर राज्यासह देशातील कोरोना संकट आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळालं. मात्र आता पुन्हा एकदा भारतातील काही शहरांमध्ये कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. राजधानी दिल्लीनंतर आता पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. पुणे शहरात आज गेल्या महिनाभरातला सर्वात मोठा आकडा समोर आला आहे.
पुण्यात आज 4396 जणांची चाचणी करण्यात आली. त्यातील 443 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील महिनाभरातील एकाच दिवसात आढळणारी कोरोनाबाधितांची ही सर्वाधिक संख्या आहे.
पुण्यात पुन्हा कोरोनाचा विस्फोट होणार?
29 ऑक्टोबरपासून पुण्यात Corona रुग्णांची दैनंदिन संख्या 380 पेक्षा कमी राहिली आहे. गेल्या काही दिवसात तर दीडशेच्या आत नव्या रुग्णांची नोंद होत होती. पण गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चित्र बदलू लागलं आहे. दिवाळीपूर्वी पुण्याच्या बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाल्याने तुफान गर्दी करत पुणेकरांनी निष्काळजीपणा केला.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पुण्यात दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत सज्ज असल्याचं सांगितलं. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या अंदाजानुसार शहरात अॅक्टिव्ह पेशंट्सचा आकडा पुन्हा वाढू शकतो. 20 सप्टेंबरला 17781 रुग्ण होते. हा आकडा 19500 किंवा 20 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
शहरात Herd immunity विकसित होण्याचीही शक्यता?
पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत असताना काही प्रभागात हर्ड इम्युनिटीची विकसित झाल्याचे संकेत मिळाले आहे. पुण्यातील 85 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. याचा अर्थ शहरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरसशी लढण्याची क्षमता निर्माण होत आहे.