पुणे, 25 जुलै : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या आवारात भोवळ येऊन पडलेल्या रुग्णाकडे रुग्णालय कर्मचाऱ्यानी दुर्लक्ष केल्याची घटना डॉ. मानसी पवार यांनी समोर आणली. त्यानंतर व्यवस्थेला पाझर फुटला आणि रुग्णालयात भर्ती होण्यासाठी धडपडणाऱ्या रुग्णाला पहाटे 3 वाजता दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णाला मदत करायला ससूनच्या सुरक्षा रक्षकांनी टाळाटाळ केल्याचा प्रकार काल सायंकाळी 5 वाजता घडला. यामुळे मानसी पवार यांनी फेसबुकवर ही घटना शेअऱ केली. त्यानंतर तब्बल 10 तासांनी म्हणजेच आज पहाटे 3 वाजता या रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. आजही पवार यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला.
ससून परिसरात मानसी पवार यांनी नेमकं काय पाहिलं?
कामासाठी ससून हॉस्पिटलमध्ये आलेल्या डॉ. मानसी पवार यांचे या रुग्णाच्या धडपडीकडे लक्ष गेलं आणि त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना त्या रुग्णाला मदत करण्यास आणि रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. पण या कर्मचाऱ्यांनी हे आमचं काम नाही म्हणत सपशेल नकार दिला. मानसी पवार यांनी हा प्रकार त्यांच्या फेसबुकद्वारे सर्वांसमोर आणला आणि याला कोण जबाबदार? असा सवाल विचारला.
मानसी पवार यांनी ससूनच्या काही कर्मचाऱ्यांना मदतीसाठी विचारला असता त्यांनी हे आमचं काम नसल्याचं सांगितलं. संबंधित कर्मचारी आणि स्ट्रेचर उपलब्ध नसल्याचंही त्यांनी सांगितलं. संबंधित कर्मचारी आल्यानंतर या रुग्णाला घेऊन जातील, तोपर्यंत तो इथेच राहील, असं सांगत त्यांनी मला तिथून जायला सांगितलं, असं म्हणत डॉ. मानसी पवार यांनी ससून रुग्णालय परिसरातील ही घटना सर्वांसमोर आणली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.