Home /News /pune /

जगातल्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचा जीव आहे या पुणेकराच्या हाती; केवळ पुण्यातूनच पोहचू शकते गरीब देशांपर्यंत कोरोना लस

जगातल्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येचा जीव आहे या पुणेकराच्या हाती; केवळ पुण्यातूनच पोहचू शकते गरीब देशांपर्यंत कोरोना लस

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली कंपनी जगातली कुठलीही संस्था तयार करत नाही, एवढ्या लशी एका वर्षात बनवते. कंपनीचे मालक आदर पुनावाला यांची दखल जगभरातल्या माध्यमांना त्यामुळे घ्यावीच लागली. वॉशिंग्टन पोस्टने कव्हर केलेल्या या पुणेकराच्या रोखठोक भूमिकेच्या बातमीचा संपादित अंश...

पुढे वाचा ...
    पुणे, 12 नोव्हेंबर : जगातल्या गरीब देशांना किंवा विकसनशील देशांना (Developing countries)कोरोनाची लस (Corona Vaccine)कोण पुरवणार? लशीच्या किल्ल्या आहेत भारताच्या हाती आणि त्यातही एका कोट्यधीश पुणेकराच्या (Pune) हाती.... या अर्थाची हेडलाइन अमेरिकेतलं प्रतिष्ठेचं वृत्तपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टमध्ये (Washigton Post) ठळकपणे प्रसिद्ध झाली. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum institute of India) सध्या कोरोना काळात (Coronavirus Pandemic) दररोजच बातमीत असते. भारतात कोरोना लशीचं (Corona Vaccine) मोठ्या प्रमाणावर उत्पादन ही कंपनी करणार आहे. हिचे मालक आहेत आदर पुनावाला (Adar Poonawalla).  या पुनावालांची सविस्तर आणि रोखठोक मुलाखत वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये कोरोना लशीच्या दोऱ्या भारताच्या हाती आहेत आणि या व्यक्तीचा त्यात मोठा सहभाग असल्याचं म्हटलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटने यापूर्वीही अनेक महत्त्वाची औषधं, लशी निर्माण केलेल्या आहेत. पण Coronavirus ने जगाचा पिच्छा पुरवल्यानंतर साऱ्या जगाचं लक्ष या विषाणूवरच्या लशीकडे लागलेलं आहे. कोरोनाच्या लशीचं जगात सर्वांत मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणार आहेत आदर पुनावाला... आणि म्हणूनच साऱ्या जगाला त्यांची दखल घ्यावी लागत आहे. सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना आदर यांचे वडील सायरस पुनावाला यांनी केली. आदर पुनावाला सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. Coronavirus च्या साथीच्या सुरुवातीलाच त्यांनी कोरोनाची लस निर्माण करण्याला प्राधान्य द्यायचं ठरवलं आणि त्यादृष्टीने तयारी केली.  या वडिलोपार्जित उद्योगातले 2500 कोटी डॉलर या लसनिर्मितीवर लावायचा मोठा निर्णय आदर पुनावाला यांनी घेतला. "कंपनीचे एवढे पैसे एकदम गुंतवणं हा मोठा धोका होता. यात अपयश यायची शक्यता होती. पण मी ही रिस्क घ्यायची ठरवली. एवढे पैसे गुंतवायचे वेळीच ठरवल्यामुळे 2021 पर्यंत आम्ही 1 अब्ज लशींची निर्मिती करण्याचं लक्ष्य पूर्ण करू शकू", आदर पुनावाला सांगतात. त्यांच्यासाठी एवढा मोठा निर्णय घेणं नक्कीच सोपं नव्हतं. 39 वर्षीय आदर पुनावाला यांचे वडीलसुद्धा एकदम कोरोना लशीवर एवढी रिस्क घेण्याच्या मताचे नव्हते. "मी आमच्या फॅमिली बिझनेसपैकी 2500 कोटी पणाला लावले आहेत. पण वडील म्हणालेही, हे तुझे पैसे आहेत. तुला हवे तसे उडव. ठीक आहे", आदर पुनावाला सांगतात. आदर पुनावाला यांनी ही जोखीम घ्यायचा निर्णय वेळेत घेतला आणि म्हणूनच आज भारत कोरोना लशीच्या प्रतीक्षेत आहे. भारतच नाही तर अनेक विकसनशील आणि गरीब देशांची नजर सीरम इन्स्टिट्यूटच्या लस निर्मितीकडे आहे. लसनिर्मितीची प्रक्रिया सोपी नाही. प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी 2024 सालची अखेर उजाडेल, असं खुद्द आदर पुनावाला यांनीच यापूर्वी स्पष्ट केलं आहे. फिनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला म्हणाले होते, "जगाच्या लोकसंख्येचा विचार करता लसनिर्मिती करणाऱ्या फार्मा कंपन्या एवढी निर्मिती करण्याच्या क्षमतेच्या नाहीत. " Serum Institute ही कोरोनाच्या लसनिर्मितीतली मोठी संस्था मानली जाते. AstraZeneca आणि Novavax यांच्यासह जगभरात पाच संस्था मिळून लशीचे 100 कोटी डोस निर्माण करण्यात येत आहे.  यातले निम्मे डोस भारतासाठी असतील. जगातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवायची असेल तर त्यासाठी किमान पाच वर्षं लागतील, असं आदर पुनावाला यांनी स्पष्टपणे सांगतात. Corona vacciene चे दोन डोस घ्यावे लागणार असतील तर 15 अब्ज डोस आवश्यक आहेत, असंही पुनावाला यांनी यापूर्वी सांगितलं होतं. रोटाव्हायरस, कांजिण्या आदी रोगांवरच्या लशी अशाच दोन डोस घेतल्याशिवाय उपयुक्त ठरत नाहीत. आता रशियाने निर्माण केलेल्या स्पुटनिक (Sputnik V) लशीसाठी  रशियाच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटशी करार करण्याचाही सीरम इन्स्टिट्यूटचा विचार आहे. या पद्धताने लसनिर्मितीच्या कामाला वेग येऊ शकतो, असं आदर पुनावाला म्हणाले. आदर पुनावाला यांनी असंही म्हटलं आहे की, लसनिर्मितीच्या प्रक्रियेत असलेली कुठलीही संस्था किंवा कंपनी महिन्याभरात गरजू व्यक्तीपर्यंत लस पोहोचवण्याच्या टप्प्यापर्यंत आलेली नाही. सगळ्या जगाला कोरोना लशीकडून आशा आहे. अनेक जागतिक नेत्यांनी लसनिर्मितीची प्रक्रिया वेगाने करण्यासाठी सर्व जोर लावला आहे आणि पुढच्या काही दिवसात लस येईल म्हणून प्रीबुकिंगही केलं आहे. पण खोटी आश्वासनं देण्यात अर्थ नाही, असं पुनावाला म्हणाले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या